उत्तर प्रदेश मुख्यमंत्रिपदासाठी नवीन चेहऱ्याची चर्चा

उत्तर प्रदेश मुख्यमंत्रिपदासाठी नवीन चेहऱ्याची चर्चा

उत्तर प्रदेशात भाजपच्या जबरदस्त विजयानंतर आता राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण? याची जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अनेकांची नावे समोर येत आहेत. त्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य, खासदार आदित्यनाथ योगी आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांची नावे चर्चेत आहेत. विशेष म्हणजे यात आणखी एका नव्या चेहऱ्याचे नाव समोर आले आहे. कानपूरमधील महाराजपूर मतदारसंघातून निवडून आलेल्या सतीश महाना यांचे नाव पुढे येत आहे. ते भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या विश्वासू नेते मानले जात आहेत.

कोईम्बतूरमध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीत उत्तर प्रदेशातील पुढील मुख्यमंत्री कोण, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत आणि वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्रिपदाचा नवीन चेहरा हा आश्चर्यचकित करणारा असू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार राज्यात भाजप दोन उपमुख्यमंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावरही विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तानुसार, महाना हे आरएसएसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत कार्यरत होते आणि तीच बाब त्यांच्यासाठी जमेची बाजू असल्याचे मानले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय समितीच्या बैठकीतही तसे संकेत दिले होते. काही लोक ‘ब्रेकिंग’मध्ये कधीच नसतात, पण त्यांचे काम चांगले असते, असे मोदी म्हणाले होते. सूत्रांच्या माहितीनुसार महाना यांना रविवारी तातडीने दिल्लीलाही बोलावण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे नाव चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. कानपूरमधून ते सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. महाना यांनी बसपच्या मनोज कुमार शुक्ला यांचा ९१८२६ मतांनी पराभूत केले होते. कानपूरमध्ये त्यांची वेगळी अशी ओळख आहे. निवडणुकांच्या आधीपासूनच भाजपचे सरकार आले तर महाना यांना मंत्रिपद निश्चित आहे, अशी चर्चा होती. पण आता त्यांचे नाव थेट मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे.

कोण आहेत महाना?

१४ ऑक्टोबर १९६० रोजी जन्म, १९९१ पासून सलग सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी ५६ टक्के मते मिळवून बसपच्या मनोज शुक्ला यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. वृत्तानुसार, महाना यांनी संघात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कामे केलेले आहे. कानपूरमध्ये महाना खूप प्रसिद्ध आहेत. छोट्या व्यापाऱ्यांमध्ये ते कमालीचे लोकप्रिय आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महाना यांना कानपूरमधून उमेदवारी मिळाली नाही.

COMMENTS