मनसेचा दणका, बिस्लेरी बाटल्यांवर मराठी भाषेत लेबल्स

मनसेचा दणका, बिस्लेरी बाटल्यांवर मराठी भाषेत लेबल्स

अनधिकृत फेरीवाले, अमराठी पाट्यांच्या विरोधात आंदोलन पुकारल्यानंतर आता मनसेने बाटलीबंद पाणी विक्री करणा-या कंपन्यांच्या बाटल्यांच्या लेबलकडे मोर्चा वळ‍वला आहे. आंध्रप्रदेश- तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही पाण्याच्या बाटल्यांवर स्थानिक भाषेत कंपनीचे नाव नमूद करण्याच्या मनसेच्या मागणीला यश आले असून बिस्लेरी कंपनीने मराठीत नाव प्रसिध्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

या कंपनीने आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यात स्थानिक तेलगू भाषेत बाटलीबंद पाण्याच्या बाटलीवर कंपनीचे नाव प्रसिध्द करण्यास सुरवात केली. पूर्वी या कंपनीच्या बाटलीवर फक्त इंग्रजी भाषेत नाव प्रसिध्द केले जात होते. पण स्थानिक भाषेत कंपनीचे नाव नसल्यामुळे अनेकदा नक्की कोणत्या कंपनीची पाण्याची बाटली आपल्याला विकण्यात आली आहे याची माहिती अनेकांना होत नव्हती. त्यामुळे दुस-याच कंपनीची पाण्याची बाटली ग्राहकांच्या गळ्यात मारली जात असल्याचे या कंपनीने केलेल्या पाहाणीत आढळून आले. त्यामुळे इंग्रजी भाषेसोबत स्थानिक भाषेतही कंपनीचे नाव प्रसिध्द करण्यास कंपनीने सुरवात केली. पण मुंबई व महाराष्ट्रात या कंपनीच्या पाण्याच्या बाटल्या इंग्रजी नावाच्या लेबलनेच विक्रीला येत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर उपाध्यक्ष सचिन मोरे,चेतन पेडणेकर यांच्या निदर्शनास आले.मनसेच्या वतीने कंपनीच्या संचालिका अंजना घोष यांना पत्र व ई-मेलव्दारे याबाबत तक्रार केली.पाण्याच्या बाटलीवर मराठी भाषेत नाव प्रसिध्द करण्याची सूचना केली.कंपनीने ही विनंती मान्य केल्याचा ईमेल चेतन पेडणेकर यांना पाठवला.सोबत मराठीत नाव असलेल्या पाण्याच्या बाटलीचा फोटोही पाठ‍वला.मराठी नावासह या पाण्याच्या बाटल्या महाराष्ट्रात लवकरच वितरित होतील असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

COMMENTS