आधी शौचालय नंतर देवालय – नरेंद्र मोदी

आधी शौचालय नंतर देवालय – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – ‘देशातील अनेक लोक रस्त्यावर थुंकतात, रस्त्यावर कचरा फेकतात. भारतमातेची अशाप्रकारे अवहेलना करणाऱ्या लोकांना खरेच वंदे मातरम् म्हणायचा हक्क उरला आहे का ? की मी जे बोलतोय त्यामुळे अनेक लोकांना वेदना होतील याची मला पूर्ण कल्पना आहे. या देशात सर्वप्रथम वंदे मातरम् बोलायचा हक्क कोणाला असेल, तर तो सफाई कामगारांना आहे. देश स्वच्छ ठेवणारे हेच लोक भारतमातेचे खरे सुपूत्र आहेत. माझ्या मते भारतात ‘आधी शौचालय नंतर देवालय’, हा विचार रुजायला पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोतील भाषणाला 125 वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने दिल्लीत आज ‘यंग इंडिया, न्यू इंडिया’ थीमवर आधारीत ‘स्टुडंट लीडर्स कन्वेंशन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

मोदींनी आपल्या भाषणात ‘स्वच्छ भारत’ मिशनवर भर देताना स्वच्छतेचा विचार मुलांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा दाखला देत समाजातील अपप्रवृत्ती आणि चुकीच्या गोष्टींवर जोरदार टीका केली. आपल्या भाषणातून स्वामी विवेकानंदांचे विचार मांडताना मोदींनी प्रगतीशील भारत घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. तरुणाईने नावीन्याचा शोध घेतला पाहिजे. भारतात प्रतिभेची कमतरता नाही. कच-यामधून नवनिर्मितीचा विद्यार्थ्यांचा प्रकल्प मी पाहिला, हा स्वच्छ भारताचा परिणाम आहे. तरुणाईला कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडू नये यासाठी माझ्या सरकारने कौशल्य विकासाला पहिले प्राधान्य दिले आहे. नोकरी मागणारा नाही, नोकरी देणारा तरुणवर्ग तयार झाला पाहिजे. अपयशाशिवाय यश मिळत नाही. यशाचा रस्ता अपयश बनवतं, म्हणून अपयशाला घाबरु नका. किना-यावर उभे राहून लाट बघू नका, समुद्रामध्ये उडी मारुन किनारा गाठा, असेही ते यावेळी म्हणाले.

COMMENTS