उत्तर प्रदेशमधील विद्यार्थ्यांना ‘योगी हेअरकट’ करण्याची सक्ती

उत्तर प्रदेशमधील विद्यार्थ्यांना ‘योगी हेअरकट’ करण्याची सक्ती

उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये शाळेत विद्यार्थ्यांना ‘योगी हेअरकट’ची सक्ती करण्यात आली आहे. शाळा प्रशासनाच्या या सक्तीविरोधात पालकांनी शाळेबाहेर आंदोलन करण्यात आले. मात्र दुसरीकडे शाळा प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावलेत. ‘आम्ही योगी नव्हे तर फौजी हेअरकटची सक्ती केली होती’ असे शाळा प्रशासनाने म्हटले आहे.

 

मेरठमधील रिषभ अॅकेडमी ही शाळा असून या शाळेतील विद्यार्थ्यांना योगी हेअरकटची सक्ती केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. योगी हेअरकट न करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देणार नाही असे शाळा प्रशासनाने म्हटले होते. तसेच शाळेत डब्यात मांसाहारी जेवण आणू नये असे पत्रकही शाळा प्रशासनाने काढले होते.

गुरुवारी योगी हेअरकट न करता शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारण्यात आला. शाळा प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात पालक आक्रमक झाले. संतप्त पालकांनी शाळेबाहेर आंदोलनही केले. पोलिस घटनास्थळी दाखल होताच शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला.

दरम्यान, शाळेचे सचिव रणजीत जैन यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. शाळेत शिस्तीचे पालन केले पाहिजे. आम्ही विद्यार्थ्यांना फौजी कट करायला सांगितले होते असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी केस बारीक ठेवावे आणि मांसाहारी जेवण आणू नये अशी नियमावली आम्ही तयार केली होती. पण अल्पसंख्याक समाजातील काही विद्यार्थ्यांनी जाणूनबुजून आमच्या नियमांचे उल्लंघन केले असा आरोप त्यांनी केला. आम्ही पालकांच्या दबावासमोर नमते घेणार नाही. शाळेत शिस्तीचे पालन झालेच पाहिजे असे त्यांनी सांगितले.

COMMENTS