कर्जमाफी देता येत नसेल तर सत्ता सोडा,आम्ही कर्जमाफी करू : पृथ्वीराज चव्हाण

कर्जमाफी देता येत नसेल तर सत्ता सोडा,आम्ही कर्जमाफी करू : पृथ्वीराज चव्हाण

मराठवाड्यातील शेतक-यांचा संघर्ष यात्रेला मोठा प्रतिसाद !

 

जालना आणि औरंगाबाद येथे विराट सभा !

 

जालना / औरंगाबाद- राज्यात ९ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या करूनही सरकारला कर्जमाफी देता येता नसेल तर त्यांनी सत्ता सोडावी,आम्ही कर्जमाफी करून दाखवतो. असे आव्हान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला दिले आहे.

 

विरोधी पक्षाच्या संयुक्त संघर्ष यात्रेच्या चौथ्या दिवशी आज मराठवाड्यातील जालना आणि औरंगाबाद येथे विराट सभेत बोलताना चव्हाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शेतक-यांच्या समस्यांची जाण नसलेले लोक सत्तेत आहेत त्यामुळे ९ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्यानंतरही मुख्यमंत्री कर्जमाफी देण्याची योग्य वेळ आली नाही असे म्हणतात. या सरकारने शेतकरी उध्वस्त केला असून सरकार विरोधातील  संघर्ष आणखी तीव्र करावा लागणार आहे. जनतेची फसवणूक करणा-या सरकारच्या मंत्र्यांना गावबंदी करा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

 

विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधकृष्ण विखे पाटील यांनीही  केंद्र आणि राज्य सरकारचा जोरदार समाचार घेतला. कर्जमाफीच्या मागणीसाठी संघर्ष यात्रा काढली असून कर्जमाफी घेतल्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही. गेल्या दोन दिवसांपासून सरकारतर्फे वर्तमानपत्रात जाहिरात देऊन लोकांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारावेत असे आवाहन केले आहे. सर्व शेतक-यांनी कर्जमाफी देणार की नाही ? हा एकच प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारावा असे विरोधीपक्षनेते म्हणाले. शेतकरी कर्जमाफी बाबत शिवसेना गंभीर असेल तर सत्तेतून बाहेर पडून संघर्ष यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन विखे पाटील यांनी उध्दव ठाकरे यांना केले.  यावेळी बोलताना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, राज्यात रोज १० ते १२ शेतकरी आत्महत्या करित आहेत. मंत्रालयात न्याय मागायला गेलेल्या शेतक-यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली जाते. शेतकरी पेटून उठला तर सरकारे कोसळतात हे देशाने अनेकदा पाहिले आहे त्यामुळे सरकारने शेतक-याचा अंत पाहू नये. शेतक-यांच्या मालकीच्या संस्था मोडीत काढण्याचा विडा या सरकारने उचलला आहे. सरकारच्या विविध महामंडळाकडे हजारो कोटींचे फिक्स डिपॉझीट पडून आहेत ते मोडून शेतक-यांना कर्जमाफी देण्याची मागणी पवार यांनी केली.  यासोबतच समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबु आझमी,  शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रविण गायकवाड यांनीही सरकारवर सडकून टीका केली.

 

दरम्यान  औरंगाबाद जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या मुलासाठी चालवल्या जाणाऱ्या शाळेला २ लाख १५ हजार रूपयांची मदत केली. त्यानंतर संघर्ष यात्रेत सहभागी नेत्यांनी आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या मुलांसोबत भोजन केले. तत्पूर्वी संघर्ष यात्रेत सहभागी सर्व नेत्यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी उपोषणाला बसलेले काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेतली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन सत्तार यांनी उपोषण सोडले.

 

आज चौथ्या दिवशी संघर्ष यात्रा मराठवाड्याच्या जालना औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात पोहोचली विविध ठिकाणी संघर्ष यात्रेचे शेतक-यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. मार्गातील खेड्यापाड्यातही अनेक शेतकरी रस्त्यावर संघर्ष यात्रेच्या प्रतिक्षेत उभे होते. मराठवाड्यात सात जिल्ह्यात प्रवास करून ही यात्रा पश्चिम महाराष्ट्रात जाणार आहे. या संघर्ष यात्रेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप,समाजवादी पक्ष,पिपल्स रिपब्लीकन पार्टी एमआयएम या सर्व विरोधी पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले आहेत.

COMMENTS