काँग्रेस कार्यकर्त्यांकडून किरण बेदींची हिटलरशी तुलना

काँग्रेस कार्यकर्त्यांकडून किरण बेदींची हिटलरशी तुलना

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुदुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांची तुलना हिटलरशी करण्यात आली आहे.  हिटलरच्या वेशातील त्यांचे पोस्टरही लावण्यात आले आहे. आमदारांच्या नियुक्ती प्रक्रियेविरोधात किरण बेदी आणि केंद्र सरकारच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनावेळी हे पोस्टर दाखवण्यात आले.

केंद्र सरकारकडून दि. ४ जुलै रोजी नियुक्त करण्यात आलेल्या तीन आमदारांना शपथ दिल्यापासून किरण बेदी या काँग्रेसच्या निशाण्यावर आहेत. पुदुचेरी भाजपचे अध्यक्ष व्ही. सामीनाथन, के.जी.शंकर आणि एस.सेल्वागणपती या तीन आमदारांचा समावेश आहे. मुख्यमंत्री व्ही.नारायणसामी आणि इतर काँग्रेस आमदारांनी केंद्राकडून नियुक्त करण्यात आलेल्या आमदारांच्या शपथविधीला विरोध केला होता.

बेदींनी त्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात वापरलेल्या पोस्टर्सबाबत सलग दोन ते तीन ट्विट केले. हे पोस्टर ट्विट करताना बेदी यांनी हात जोडणारी इमोजीही पोस्ट केली आहे. एकंदर या प्रकारामुळे सत्ताधारी काँग्रेस व राज्यपाल बेदी यांच्यातील संघर्षात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

किरण बेदींची कार्यशैली ही एखाद्या हुकूमशहाप्रमाणे असल्याचे सांगत काँग्रेसने पुदुचेरी बंदचे आयोजनही केले होते. प्रदेश काँग्रेस समितीकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने किरण बेदींना नायब राज्यपालपदावरून हटवावे, अशी मागणी केंद्राकडे करत आहे.

 

COMMENTS