पंकजा मुंडेंना हवे आहे गृह खाते !

पंकजा मुंडेंना हवे आहे गृह खाते !

बीड – राज्याचे गृह खाते ज्या वेळेस माझे वडील गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे होते, त्या वेळेस गृह खात्याद्वारे गुन्हेगारी जगात मुळापासून उपटून काढण्याचे काम माझे वडील स्व. मुंडे यांनी केले, ते मी जवळून पाहिले आहे, असे म्हणत गृह खात्यावर आपला हक्क असल्याची सुप्त इच्छा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी माजलगाव येथे रविवारी व्यक्त केली.

 

माजलगाव उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, माजलगाव ग्रामीण पोलिस ठाणे कार्यालय अधिकारी-कर्मचारी यांच्या निवासस्थानाच्या उद््घाटनप्रसंगी रविवारी (दि. 16) ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, गृह खाते हे माझे आवडते खाते आहे. स्व.गोपीनाथ मुंडे यांनी गृहमंत्री असताना मुंबईतील गुन्हेगारांची असलेली दहशत नेस्तनाबूत करण्याचे काम केले. हे मी अत्यंत जवळून पाहिलेले असल्याने गृह खात्यावर माझे विशेष लक्ष आहे. परंतु ते खाते माझ्याकडे नसले तरी ते माझे आवडते आहे. मी कायम पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडण्यासाठी आग्रही आहे. त्यानुसार अंबाजोगाई येथील अधिकारी कार्यालय वसाहतीचे गेल्या दहा वर्षांपासून रखडलेले काम पूर्ण केले आहे. आता माजलगावातील कामाची पायाभरणी करून त्याचे उद्घाटन केलेले आहे. पोलिस कर्मचाऱ्यांना मिळालेली निवासस्थाने ही त्यांच्या परिवाराला सामावून घेण्यात कमी पडत आहेत. यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू असे त्या म्हणाल्या. निवासस्थानातील खोल्यांमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोलिस वसाहतीत व्यायाम शाळा, प्रशस्त बगिचे उभारणीसाठी आपण आग्रही असून त्यासाठी आपण प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

 

यापूर्वी पंकजा यांनी मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे सांगून मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता त्यांनी गृहमंत्री होण्यास आवडेल, असे सांगून गृहमंत्रिपदावर दावा केला आहे. गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

COMMENTS