‘जलयुक्त शिवार’ भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी शिवसेनेचा मोर्चा

‘जलयुक्त शिवार’ भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी शिवसेनेचा मोर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

या योजनेतील भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याचा इशारा संजय पवार यांनी दिला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चात बैलगाडीमध्ये देखावा उभारण्यात आला होता. त्यात शेतकरी आत्महत्या करत असल्याचे दाखवण्यात आले होते.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्याधिकारी इंद्रजीत देशमुख यांचा योजनेबाबतचा अहवाल खुला करण्यात यावा, तसेच दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे करण्यात आली. या प्रकरणात बडे मासे गळाला लागतील, असा दावा शिवसेनेने केला आहे. या प्रकरणात अधिकारी पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची दिशाभूल करत असल्याचा दावा संजय पवार यांनी केला आहे.

COMMENTS