तूर खरेदीसाठी शिवसेना आमदाराचं महामार्गावर मुंडन

तूर खरेदीसाठी शिवसेना आमदाराचं महामार्गावर मुंडन

चंद्रपूर : तूर खरेदीच्या मुद्द्यावर चंद्रपुरात शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसत आहे. चंद्रपुरातील वरोरा शहरात महामार्गावर शिवसेनेने आज चक्काजाम आंदोलन केले. राज्य सरकारच्या धोरणाविरोधात आमदार बाळू धानोरकर यांनी मुंडन केले आणि सरकारचा निषेध व्यक्त केला.
चंद्रपुरात तूर खरेदीतील धोरण लकव्याचे कारण पुढे करत स्थानिक आमदार बाळू धानोरकर यांनी मोठे चक्काजाम आंदोलन केले. जिल्ह्यातील वरोरा शहरातून चंद्रपूर-नागपूर महामार्ग जातो. नेमक्‍या याच भागात शिवसेनेने चक्काजाम आंदोलन केले. शिवसैनिकांनी बैलगाड्याद्वारे हा महामार्ग रोखून धरला. तूर खरेदी संदर्भातील वेगवेगळे आदेश आणि त्यातून शेतकऱ्यांची झालेली संभ्रमावस्था यामुळे शेतकरी नागवला गेल्याचा आरोप सेनेने यावेळी केला.

केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आमदार बाळू धानोरकर यांनी महामार्गवरच मुंडन केले. शिवसेनेच्या या आंदोलनामुळे चंद्रपूर -नागपूर महामार्गावर दोन्ही बाजूला वाहतूक एक तास ठप्प झाली होती. वाहनांच्या लांब लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात शिवसैनिकांनी तुरीच्या घुगऱ्या वाटून आला निषेध व्यक्त केला.

COMMENTS