नांदेडमध्ये पीकविमा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी ठोकले बँकेला कुलूप

नांदेडमध्ये पीकविमा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी ठोकले बँकेला कुलूप

देगलूर  – खरीप हंगाम 2016 मधील खरीप पीकविमा भरलेल्या जवळपास 300 शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीकविम्याची मंजूर रक्कम आणि अनुदान न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शिवसेना देगलूर तालुकाप्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली देगलूर येथील मोंढा मैदानातील इंडिया बॅंकेला (हैदराबाद) तब्बल चार तास व्यवहार बंद करून बॅंकेला कुलूप लावून तीव्र निदर्शने केली. हा प्रकार शनिवारी (ता. 11) घडला.

जुन्या हैदराबाद बॅंकेच्या नवी इंडिया बॅंकेत रमतापूर, होट्टल, काठेवाडी, कुशावाडी, बल्लूर, नरंगल, रामपूर, लोणी, मरखेल, शिवणी, भक्तापूर, बळेगाव, गवंडगाव, चैनपूर, नागराळ, मुजळगा आदींसह वीस गावांतील जवळपास 300 शेतकऱ्यांनी 2016 सालातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस या पिकांचा विमा बॅंकेत पैसे भरून पाेच पावती घेतली होती. बॅंकेच्या हलगर्जीपणामुळे व ढिसाळ निष्क्रिय कारभारामुळे 300 शेतकऱ्यांच्या पीकविम्याची रक्कम बॅंकेने विमा कंपनीकडे मुदतीच्या आत जमा न केल्याने हे शेतकरी पीकविमा अनुदानापासून वंचित असून बॅंकेला वारंवार निवेदन देऊन घेराव देखील (ता. 24 जुलै) शाखाधिकारी प्रसाद यांना घातला होता. तेव्हा शेतकऱ्यांचा संताप पाहून ता. 11 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना पीकविमा वाटप करून असे लेखी आश्वासन शाखाधिकारी प्रसाद यांनी दिले होते. त्यामुळे शेतकरी पीकविमा उचलण्यासाठी बॅंकेत आले असता शाखाधिकारी रजेवर असल्याचे समजल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करीत घोषणाबाजी करून बॅंकेचा व्यवहार बंद पाडून बॅंकेला कुलूप लावून संताप व्यक्त केला.

 

 

COMMENTS