नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपची सूत्रे शिवसेनेच्या आमदाराकडे ?

नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपची सूत्रे शिवसेनेच्या आमदाराकडे ?

नांदेड – नांदेड महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झालीय. येत्या ऑक्टोबरमध्ये महापालिकेची निवडणुक आहे.  सर्वच पक्षाची त्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अर्थात सत्ताधारी भाजप नेहमीप्रमाणे यामध्ये पुढे आहे. पक्षाने या निवडणुकीची जबाबदारी शेजारच्या लातूर महापालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये ऐतिहासीक विजय मिळवून दिलेल्या संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे सोपवली आहे. मात्र हे करत असताना नांदेडमधलाच तगडा नेता गळाला लावून त्याच्याकडे निवडणुकीची सूत्रे सोपवण्याचा भाजपचा विचार दिसतोय. अशोक चव्हाण यांचे कट्टर विरोधक आणि शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना गळाला लावून त्यांना पक्षात घेऊन त्यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे देण्याचा भाजपचा विचार असल्याचं बोललं जातंय. कालच प्रदेशाध्यक्ष रावसादेब दानवे नांदेडच्या महिला मेळाव्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी चिखलीकर यांच्याशी जवळपास 1 तास  गुप्तगु केलं आहे. दोन्ही नेत्यांनी ही भेट वैयक्तीक असल्याचं सांगितलं असलं तरी राजकीय डीलसाठी ती बैठक होती असं बोललं जातंय.

मंत्रीमंडळाच्या  विस्तारात स्थान न मिळाल्याने प्रताप पाटील चिखलीकर शिवसेनेच्या नेतृत्वावर नाराज आहेत. त्यांच्या महत्वाकांक्षा मोठ्या आहेत. शिवेसनेत त्या पूर्ण होणार नाही असं त्यांना वाटंतय. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून ते मुख्यमंत्र्यांची तोंडभरुन स्तुती करत आहेत. तसंच भाजपच्या विविध कार्यक्रमाला हजेरी लावत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या वर्तुळात चिखलीकरांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजलाही चिखलीकरांसारखा बडा नेता गळाला लागत असल्यास हवाच आहे. नव्हे त्यांची ती रणनितीच आहे. त्यामुळे चिखलीकर लवकरच आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी अनेक अदृष्य हात सरकारला मदत करतील असं सूचक वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. “त्या”  अदृश्य हातांपैकीच हा एक हात आहे की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. असा प्रवेश झाल्यास आधीच दोन्ही पक्षात असलेला तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्याचा सरकारच्या स्थर्यावरही परिणाम होतो का ?  हे येणारा काळच सांगेल.

COMMENTS