निवडणूक आयोगाकडे तमिळनाडूतून तब्बल 10 लाख शपथपत्रे दाखल

निवडणूक आयोगाकडे तमिळनाडूतून तब्बल 10 लाख शपथपत्रे दाखल

दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकची दोन शकले झाली होती. माजी मुख्यमंत्री ओ.पन्नीरसेल्वम आणि विद्यमान मुख्यमंत्री ई. पळनीस्वामी यांच्या गटांमध्ये दोन पाने हे चिन्ह मिळविण्यासाठी आता चुरस लागली आहे. या निवडणूक चिन्हाची लढाई आता शेवटच्या टप्प्यात पोचली असून शुक्रवारी या संदर्भात कागदपत्रे दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.

निवडणूक आयोगाला आतापर्यंत तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त शपथपत्रे मिळाली असून त्यात मुख्यमंत्री ई. पळनीस्वामी यांचा गट पुढे आहे. मुख्यमंत्री ई. पळनीस्वामी यांच्या गटाने सादर केलेल्या शपथपत्रांचे वजन 60 टन आहे. या गटाने 6 लाख 82 हजार 752 शपथपत्रे सादर केली असून त्यातील 2.84 लाख शपथपत्रे एकट्या शुक्रवारी सादर करण्यात आली. या एकूण शपथपत्रांसाठी पळनीस्वामी गटाने 1.36 कोटी रुपये खर्च केले आहेत.

दुसरीकडे माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाने 3.8 लाख शपथपत्रे सादर केली आहेत. त्यात 20 हजार शपथपत्रे शुक्रवारी सादर करण्यात आली.

सत्ताधारी गटाने आणखी दोन आठवड्यांची मुदत देण्याची मागणी केली आहे. ती आयोगाने मान्य केल्यास शपथपत्रांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. आपल्या गटाच्या बाजूने समर्थकांचा पुरावा म्हणून तमिळनाडूचे कायदामंत्री सी.व्ही. षन्मुगम हे चार ट्रकभरून शपथपत्रे घेऊन दिल्लीत पोचले होते.

 

COMMENTS