पनवेलमध्ये स्वाभिमानी – शिवसेना युती, सदाभाऊ मात्र भाजपच्या प्रचारसभेत !

पनवेलमध्ये स्वाभिमानी – शिवसेना युती, सदाभाऊ मात्र भाजपच्या प्रचारसभेत !

पनवले – पनवेल महापालिका निवडणूक दोन दिवसांवर आल्यामुळं सर्वच पक्षांनी प्रचारासाठी राज्य पातळीवरल नेत्यांना पाचरण केलं आहे. काल पनवेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा झाली.  या प्रचारसभेत कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही हजेरी लावली. खरंतर पनवेल महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि स्वाभीमानी शेतकरी संघटना यांची युती झाली आहे. असं असताना सदाभाऊ खोत हे चक्क मुख्यमंत्र्यांनी भाजपसाठी आयोजित केलेल्या प्रचारसभेत हजेरी लावल्यामुळे सदाभाऊंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उत आला आहे. एकीकडे राजु शेट्टी यांनी पुण्यातून आजपासून सुरू केलेल्या आत्मक्लेश यात्रेला सदाभाऊ खोत यांनी दांडी मारली. तर दुसरीकडे भाजपच्या प्रचारसभेला मात्र ते आवर्जून हजर राहिल्याने आता सदाभाऊंचा भाजप प्रवेश याच्यात फक्त औपचारिकताच बाकी असल्याचं बोललं जातंय. गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राजु शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात विसंवाद निर्माण झाल्याचं अनेकवेळा दिसून आलं आहे. दोघांनी एकमेकांवर केलेल्या टीकेमुळे या विसंवादाला अधिक धार आली आहे. दोघांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियात एकमेकांची यथेच्छ धुलाई सुरू आहे. पनवेलच्या सभेत सदाभाऊ असलेली चित्रफीत आमच्याकडे नाही. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणाच्या सुरूवातील स्टेजवर उपस्थित असलेल्या नेत्यांची नावे घेतली त्यामध्ये सदाभाऊंचाही उल्लेख केला आहे.

 

COMMENTS