पुणे : पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोरच राष्ट्रवादी काँग्रेसची चूल

पुणे : पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोरच राष्ट्रवादी काँग्रेसची चूल

पुणे – देशाच्या वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज  पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कसबा गणपती येथील कार्यालयासमोर चूल मांडून निषेध नोंदवण्यात आला.

यावेळी राष्टवादी काँग्रेसच्या पुणे शहर अध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादी पुणे महिला आघाडीच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.  भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. भाजपने जनतेला अच्छे दिन देण्याचा वादा केला होता हेच का ते अच्छे दिन असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला.

केंद्र सरकार जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवत असून गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या दरवाढीमुळे सर्व सामान्यांचे जगणे महाग झाले आहे. त्यामुळे महागाईवर सरकारने अंकुश लावण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली. यावेळी वंदना चव्हाण म्हणाल्या की, केंद्रात भाजप सरकार सत्तेत आल्यापासून सर्व सामान्य नागरिकांच्या हिताचा एकही निर्णय घेण्यात आलेला नाही. सामान्य नागरिक रस्त्यांवरील खड्यांमुळे त्रस्त असताना हे सरकार उद्योगपतींसाठी ‘रेड कार्पेट’ टाकण्याचे काम करत आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. महागाईमुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर महागाई आटोक्यात आणावी, अन्यथा भविष्यात तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

COMMENTS