पुत्र प्रेमात पालकमंत्री झाले धृतराष्ट्र, जितेंद्र आव्हाड यांची टीका

पुत्र प्रेमात पालकमंत्री झाले धृतराष्ट्र, जितेंद्र आव्हाड यांची टीका

ठाणे – ठाणे रेल्वे स्टेशन ते विटावा स्कायवॉकच्या श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात श्रेयवादावरुन जुंपली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात 2004 मध्येच या स्कायवॉकचे भूमिपुजन केल्याचा दावा माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. तर शिवसेनेनं आज या कामाचं भूमिपूजन ठेवलं आहे. 2014 मध्येच याचं भूमिपूजन झालं असताना या कामाचे श्रेय आपल्या मुलाला मिळावे, यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा भूमिपूजन करण्याचा घाट घातला आहे. पुत्र प्रेमासाठी एकनाथ शिंदे महाभारतामधील धृतराष्ट्र झाल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

या स्कायवॉकच्या उभारणीमागे विटावा भागातील नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीतून सुटका करुन देण्याचा आपला उद्देश होता. त्यासाठीच  एमएमआरडीएच्या स्तरावर आपण मंत्रिपदाच्या काळात पाठपुरावा केला होता.  25 ऑगस्ट 2014 रोजी तत्कालीन नगरविकास मंत्री उदय सामंत आणि आपल्या हस्ते या स्कायवॉकच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. यावेळी एमएमआरडीएचे अधिकारीदेखील उपस्थित होते.  पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आपल्या मंत्रिपदाच्या काळात या कामाला मंजुरी मिळाली असून दोन वर्ष विविध प्रकारच्या मंजुर्‍या घेण्यासाठी आपणच पाठपुरावा केल्यानंतर आता 1 महिन्यापूर्वी या कामाचे कार्यादेश काढण्यात आले आहेत. आपण केलेल्या कामाचे श्रेय आता पालकमंत्री घेत असून आपल्या पुत्राच्या प्रेमात पालकमंत्री धृतराष्ट्र झाले असल्याची टीका आव्हाड यांनी केली आहे. या कामाचे भूमिपूजन झाल्यानंतर राज्यातील अनेक वृत्तपत्रांमध्ये एमएमआरडीएने जाहिरातीही दिल्या होत्या. तसेच, भूमिपुजनाचे वृत्तही अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले होते, असे सांगून यासंदर्भात सर्व पुरावे आणि भूमिपुजनाची छायाचित्रदेखील पत्रकारांसमोर सादर केले.

COMMENTS