फोडाफोडी आणि थैलीशाहीचे राजकारण नेहमी यशस्वी होत नाही – शिवसेना

फोडाफोडी आणि थैलीशाहीचे राजकारण नेहमी यशस्वी होत नाही – शिवसेना

अशोक चव्हाणांनी भाजपच्या विजयाचा चौखूर उधळलेला वारु रोखला असून फोडाफोडीचे आणि थैलीशाहीचे राजकारण नेहमीच यशस्वी होत नसते, हा या निवडणुकीचा सर्वात मोठा धडा असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. नांदेड महापालिका निवडणुकीत काँग्रेसने 81 पैकी 73 जागा जिंकून अभूतपूर्व यशाची नोंद केली. 51 पेक्षा अधिकचे लक्ष्य जाहीर करणाऱ्या भाजपला निवडणुकीत फक्त 6 जागांवर समाधान मानावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगारमंत्री संभाजी निलंगेकर आणि भाजपचे अन्य नेते नांदेडमध्ये प्रचारात उतरले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर तोंडसूख घेण्यात आले आहे. 

मोदी लाटेच्या उदयापासून भाजप विजयाचा चौखूर उधळलेला वारू अशोक चव्हाणांनी रोखला. भाजपच्या घोडदौडीला लगाम घातला वगैरे वगैरे विश्लेषण नांदेड महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झाले आहे. अशी टीका अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेनेने केली आहे.

संपूर्ण देश काँग्रेसमुक्त करण्याचा संकल्प करणाऱ्या आमच्या मित्रपक्षासाठी मात्र नांदेडचा निकाल अतिशय धक्कादायक आहे. भाजपचा पराभव करता येऊ शकतो, असा स्पष्ट संदेश नांदेड निवडणुकीच्या माध्यमातून देशभर पसरला आहे. हा पराभव साधासुधा नाही असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टीने जशी भाजपला आपटी दिली होती तशीच ही धोबीपछाड आहे. भाजपने नांदेडची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांपासून भाजपचे सर्वच मंत्री सर्वशक्तीनिशी या निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. तरीही भारतीय जनता पक्षाचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. सत्ता आणि पैशाचा वारेमाप वापर आणि आयाराम-गयारामांना मिठय़ा मारूनही जनतेने आपल्याला का झिडकारले, याचे चिंतन वगैरे यथावकाश होत राहील.

मात्र फोडाफोडीचे आणि थैलीशाहीचे राजकारण सदासर्वकाळ यशस्वी होत नसते, हा या निवडणुकीचा सर्वात मोठा धडा आहे. महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागताच भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकांप्रमाणेच आयारामांचे दुकानच उघडले. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे तब्बल पंधरा नगरसेवक भाजपने आपल्या तंबूत दाखल करून घेतले. या सर्वांच्या हातात कमळ देऊन भाजपने त्यांना उमेदवारी दिली. आपापल्या पक्षांशी बेईमानी करून गेलेल्या बहुतांश नव्या ‘कमलदल’धा-यांना नांदेडकरांनी चिखलात घुसळून पार उलथेपालथे केले. असे ताशेरे अग्रलेखातून ओढण्यात आले.

COMMENTS