बाबरी मशीद प्रकरण: लालकृष्ण अडवाणींसह 12 जणांना जामीन मंजूर

बाबरी मशीद प्रकरण: लालकृष्ण अडवाणींसह 12 जणांना जामीन मंजूर

अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने आज (मंगळवार) भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासह 12 जणांना जामीन मंजूर केला.

6 डिसेंबर 1992 रोजी कटकारस्थान करून मशीद पाडल्याच्या भाजप नेत्यांवरील आरोपाची न्यायालय तपासणी करण्यात येणार आहे. न्यायालयाने अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी, विनय कटियार साध्वी ऋतंभरा आणि विष्णू हरी डालमिया यांच्यासह 12 जणांना आज न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. आज सकाळी सर्वजण सुनावणीसाठी न्यायालयात हजर होते. या सर्वांना न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. आरोपांवरील सुनावणी अद्याप बाकी आहे.

गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात भाजप नेत्यांविरुद्ध पूर्वनियोजित कट रचल्याचा ठपका ठेवला होता. त्यानुसार न्यायालयाने अडवाणी, उमा भारती आणि जोशी यांच्याविरुद्ध कटकारस्थानसंबंधीचा खटला चालविण्याचे निर्देश दिले होते. त्यांचा खटला रायबरेली न्यायालयातून लखनौच्या न्यायालयात हस्तांतरित करण्यात आला होता.

 

COMMENTS