मतदानाचा टक्का वाढण्यासाठी नवी युक्ती !

मतदानाचा टक्का वाढण्यासाठी नवी युक्ती !

चंद्रपूर – राज्यातील मतदानाची टक्केवारी घसरत असल्याचे दिसून येते. त्यामुळं जेव्हा जेव्हा राज्यात निवडणूक होतात तेव्हा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध प्रकारातून जनजागृती केली जाते. तसेच मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहिर करुनही तरुण वर्ग मतदान केंद्रांकडे पाठ दाखवत असल्याचं चित्र आहे. यातच बुधवारी चंद्रपूर पालिकेसाठी मतदान होणार आहे. त्यामुळं चंद्रपूर पालिकेनं मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी युक्ती लढवली आहे.

यासाठी पालिकेने तरुण वर्गाला मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी तरुणाईमध्ये क्रेझ असणा-या सेल्फीची स्पर्धा घेण्याचे ठरविले आहे. प्रशासनानं मतदान करा सेल्फी काढा, दिलेल्या व्हॉट्सऍप नंबरवर पाठवा आणि लकी ड्रॉ जिंका अशी योजना घोषित केली आहे. मतदान करुन दिलेल्या नंबरवर आपला सेल्फी पाठविल्यावर त्यातून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. एकूण 125 बक्षिसे या स्पर्धेत देण्यात येणार असून यात मोबाईलाची समावेश आहे.

चंद्रपूर पालिकेसोबतच शहरातील हॉटेल, दुकानदार मालकांनी सुद्धा मतदानाच्या जनजागृतीसाठी प्रयत्न सुरु केले. बोटाची शाई दाखवा आणि 5 टक्के सुट मिळवा असा उपक्रम हॉटेल मालकांनी सुरु केला आहे. दरम्यान,’ पालिकेचा तरुण वर्गाला मतदान केंद्राकडे वळवण्याचा हा प्रयत्न किती यशस्वी होणार हे तर मतदानाच्या दिवशीच कळणार.

COMMENTS