मुख्यमंत्र्यासाठी चक्क 1 किलोमीटर रस्ता धुतला, तीव्र पाणीटंचाईमध्ये लाखो लिटर पाण्याची नासाडी !

मुख्यमंत्र्यासाठी चक्क 1 किलोमीटर रस्ता धुतला, तीव्र पाणीटंचाईमध्ये लाखो लिटर पाण्याची नासाडी !

यवतमाळ – जनतेला पाण्याचा काटकसरीने वापर करा असे उपदेशाचे डोस पाजणा-या सरकारच्या एका विभागाने मुख्यमंत्री गावात येणार म्हणून चक्क 1 किलोमीटर रस्ता धुवून काढला. राज्यात सध्या तीव्र उन्हाळा आहे. अनेक ठिकाणी पाणीटंचाईमुळे टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. अशी स्तिती असतानाही मुख्यमंत्र्या कार्यक्रमासाठी तब्बल 1 किलोमीटर रस्ता पाण्याने धुवून काढण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा आढावा बैठक घेण्यासाठी यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यातील सरूळ या गावी आले होते. त्यांच्या आगमनासाठी सारे गाव सजले, ग्राम पंचायत कार्यालय, शाळा, दवाखाना सजविला गेला.  सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील मुख्यमंत्र्यांची बडदास्त ठेवण्यात काही कसर राहू नये म्हणून चक्क रस्ता धुऊन काढण्याचा प्रताप केला. जिल्ह्यात अनेक गावांत पाण्यासाठी महिला भगिनींची वणवण होत असतांना आणि धरणांमधील पाणी साठा तळ गाठत असतांना पाण्याचा जपून वापर केला पाहिजे असे आवाहन शासन, प्रशासन करीत आहे. मात्र याचे भान विसरून यवतमाळच्या बांधकाम विभागानं पाण्याचा अपव्यय केला. मुख्य रस्त्यापासून सरूळ या गावापर्यंतचा एक किलोमीटर अंतराचा डांबरी रस्ता चकाचक करून मुख्यमंत्र्यांची वाहवा मिळविण्यासाठी चक्क हा रस्ता पाण्याने धुऊन काढला. या रस्त्यावर एक वेळ नाही तर चार वेळा टँकर ने पाणी ओतून पाण्याची नासाडी केली. हा सर्व प्रकार जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमक्ष मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सुरू होता. तहानलेल्या ग्रामस्थांसाठी तो चीड आणणारा होता.

COMMENTS