मोदींच्या काळातही भ्रष्टाचार थांबलेला नाही, अण्णा हजारे पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात….

मोदींच्या काळातही भ्रष्टाचार थांबलेला नाही, अण्णा हजारे पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात….

अहमदनगर – केंद्रातील यूपीए सरकारच्या विरोधात देशव्यापी सर्वात मोठे आंदोलन करुन काँग्रेस आणि युपीए 2 सरकारच्या विरोधात जनमत तयार करण्यात ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी मोठी भूमिका बजावली होती. त्यावेळी त्या आंदोलनला भाजप नेत्यांनी छुपा पाठिबाही दिला होता. त्यातूनच आम आदमी पार्टी या पक्षाची स्थापना झाली. त्याचसोबत केंद्रात मोदींची लाट निर्माण होण्यासाठी आणि भाजपचा ऐतिहासीक विजयामध्ये आण्णांच्या आंदोलनाचा मोठा वाटा होता. यूपीए सरकारच्या काळत झालेले घोटाळे आणि भ्रष्टाचार या दोन मुख्य मुद्यांवर या आंदोलनाचा भर होता. त्याचा जबर फटका काँग्रेसला बसला तेवढाच मोठा फायदा भाजपला झाला. मात्र आता ही चक्रे उलट्या दिशेने फिरण्याचे संकेत मिळत आहेत. मोदी सरकारच्या काळातही भ्रष्टाचार थांबलेला नाही. केंद्रात सरकार येऊन 3 वर्ष पूर्ण होत आहेत. तरीही भ्रष्टाचाराच्या मुद्यावर काही प्रगती झाली नाही असा नाराजीचा सुर ज्येष्ठ समाजवेक अण्णा हजारे यांनी लावला आहे. अहमदनगरमध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली. त्यामुळे आता आंदोलन करण्याची वेळ आली आहे असंही अण्णा म्हणाले.

 

यावेळी अण्णा हजारे यांनी लोकपाल नियुक्तीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केले. केंद्र सरकारला लोकपाल नियुक्त करण्याची इच्छा नाही. लोकपालाची नियुक्ती शक्य नसेल तर निदान राज्यांमध्ये लोकायुक्तांची नियुक्ती केली जावी. ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे, तेथे लोकायुक्त नेमण्यात काय अडचण आहे, असा सवाल अण्णा हजारे यांनी मोदी सरकारला विचारला.

 

लोकपाल कायदा व्हावा ही जनतेच्या ‘मन की बात’ होती. पूर्वीच्या सरकारने त्यासाठी कायदा केला, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. हा जनतेच्या भावनांचा अपमान आहे. लोकांना वाटतेय की अण्णा हजारे गप्प बसले आहेत, पण आपण गप्प बसलो नाही. आता पुन्हा एकदा आंदोलन करावे लागेल असे वाटते. दिल्लीत जाऊन ते करण्यासाठी तयार आहे. माझे मनही मला सांगत आहे, पुन्हा एकदा आंदोलन कर. मी त्यासाठी तयार असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले. त्यामुळे मी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आंदोलनाची तारीख कळवणार आहे. या आंदोलनासाठी फेसबुक पेजही तयार करण्यात आले आहे. लोकांना हे फेसबुक पेज लाईक करून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही यावेळी अण्णा हजारे यांनी केले.

 

COMMENTS