युवासेना, सेनेच्या महिला आघाडी कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना लावले हुसकावून

युवासेना, सेनेच्या महिला आघाडी कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना लावले हुसकावून

ठाण्यात एकीकडे महापालिका आयुक्त स्वतः अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात रस्त्यावर उतरत असताना दुसरीकडे कल्याणात मात्र महापालिका प्रशासनाचा काही धाक उरलेला नाहीये. पालिका प्रशासनाच्या या नाकर्तेपणाविरोधात युवासेना आणि सेनेच्या महिला आघाडीने रस्त्यावर उतरत फेरीवाल्यांना हुसकावून लावले. तर आक्रमक झालेल्या आंदोलकांनी काही ठिकाणी फेरीवाल्यांना मारहाणही करण्यात आली. विशेष म्हणजे याठिकाणी स्वतः शिवसेना सत्तेमध्ये असून त्यांच्यावरच अशा प्रकारच्या आंदोलनाची वेळ ओढवली आहे.

युवासेना आणि महिला आघाडीने अचानक केलेल्या या आक्रमक आंदोलनामुळे डोंबिवली पूर्वेत स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली. तर फेरीवाल्यांना या आंदोलनाची जशी माहिती समजली तशी अनेकांनी अगोदरच धूम ठोकली. डोंबिवली स्टेशन परिसरात असणाऱ्या फेरीवाल्यांचा इथल्या नागरिकांना प्रचंड त्रास होतोय. याबाबत शिवसेना शाखेकडे अनेक महिलांच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र स्थानिक नगरसेवक आणि महापालिका अधिकारी यांना पैसे मिळत असल्याने ते याविरोधात कारवाई करीत नसल्याची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी दिली. आम्ही सत्तेत आहोत की नाही आहोत हे आम्हाला माहिती नाही. नागरिकांची गैरसोय होणार असेल तर आम्ही अशा प्रकारचे हे आंदोलन करावे लागेल. वेळ पडल्यास महापालिका अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू असा सज्जड दमच दिपेश म्हात्रे यांनी यावेळी दिला आहे.

यावेळी युवासेना आणि सेनेच्या महिला आघाडी कार्यकर्त्यांनी इंदिरा चौक ते स्टेशन परिसरातील अनेक फेरीवाल्यांना हुसकावून लावले. या आंदोलनानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे समजते.

COMMENTS