राज्यमंत्री फक्त नामधारी, राजू शेट्टी यांचा सदाभाऊ खोतांना घरचा आहेर

राज्यमंत्री फक्त नामधारी, राजू शेट्टी यांचा सदाभाऊ खोतांना घरचा आहेर

शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी विरोधी पक्षांनी संघर्ष यात्रा काढली, आ. बच्चू कडू यांनी आसुड यात्रा काढली. या दोन्ही यात्रेतून शेतक-यांचे प्रश्न अजूनतरी सुटलेले नाहीत. त्यात आता राज्य सरकारचा एक घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी संघटना शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा, कर्जमाफी करावी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्यांसाठी आत्मक्लेश यात्रा काढणार आहे.

आत्मक्लेश यात्रेत सदाभाऊ खोत हे आजारी असल्याने सहभागी होणार नसल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 22 मे रोजी याची सुरवात पुण्यातील महात्मा फुले वाड्यातून होणार असून मुंबईपर्यंत पायी चालत जाऊन राज्यपालांना निवेदन देणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.  शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 22 ते 30 मे या कालावधीत आत्मक्लेश यात्रा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ही आत्मक्लेश यात्रा जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने जाणार आहे. 30 मे पर्यंत मुंबईत पोहोचून राज्यपालांना भेटून शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीसाठी निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी  राजू शेट्टी  म्हणाले, आपला विधानसभेतील अनुभवाचा दाखला देत, राज्यमंत्र्याचे अधिकार, आणि कामे याविषयी उपहासात्मक वक्तव्य करत खोत यांना नामधारी मंत्री असा टोला लगावला. खोत यांना कोणतेही निर्णयही घेता येत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. मी देखील पंधरा वर्षे आमदार राहिलो आहे, त्यामुळे राज्यमंत्र्यांना काय अधिकार असतात हे मला चांगलेच माहित आहे, असे सांगत खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर निशाना साधला.

आत्मक्लेश यात्रेऐवजी तुम्ही सत्तेतून बाहेर का पडत नाही, असा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देताना ते बोलले, आमचा सत्तेतील सहभाग अतिशय सूक्ष्म आहे. त्यामुळे सत्तेत असल्याने काही फरक पडणार नाही. आणि मुळातच आमच्यातील एकजण जरी राज्यमंत्री असला तरी देखील पंधरा वर्षापासून मी आमदार असल्याने राज्यमंत्र्याला काय अधिकार असतात हे मला चांगलेच माहित आहे. त्यामुळे त्याने काही फरक पडणार नाही, असे सांगत त्यांनी सदाभाऊंना टोला लगावला.

 

COMMENTS