लेकीनं गड राखला ……..!

लेकीनं गड राखला ……..!

लक्ष्मीकांत रुईकर,बीड

कौन कहता है की आसमान मे छेद नही हो सकता, एक पत्थर तो तबियत से उच्छालो यारो ! अस जे म्हटलं गेलं आहे ते सार्थ ठरविणार दृश्य शनिवारी सावरगाव येथे दिसून आलं.स्व गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेली भगवान गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा वादात अडकली अन खंडित झाली,मात्र त्यामुळे न डगमगता पंकजा मुंडे यांनी अवघ्या दोन दिवसात हाच दसरा मेळावा भगवान बाबा यांच्या जन्मभूमीत यशस्वी करून दाखवला अन समाज आपल्याच पाठीशी असल्याचे दाखवत विरोधकांचे दात घशात घातले .त्याच बरोबर कितीही संकट आली तरी ” बघतोस काय रागानं गड राखलाय लेकीनं ” हा संदेश देण्यात त्या यशस्वी झाल्या.

महाराष्ट्राच्या राजकारणात कायम या ना त्या कारणाने चर्चेत असणाऱ्या नावांपैकी एक नाव म्हणजे पंकजा गोपीनाथ मुंडे होय. बेधडक बोलणे, निर्णय घेतांनाचा बिनधास्तपणा, परिणामांची फिकीर न करता मनात आलं ते बोलणे , सभा समारंभात लोकांना काय अपेक्षित आहे तेच बोलणे यामुळे पंकजा नेहमीच मीडियामध्ये आपलं वेगळं स्थान टिकवून आहेत. राज्याच्या राजकारणात त्यांना मानणारा एक मोठा समूह आहे, कदाचित ती स्व गोपीनाथ मुंडे यांची पुण्याई देखील असेल मात्र त्यांच्या नंतर ती जपण्याचं काम पंकजा मुंडे यांनी केलं आहे .लाखोंच्या सभा आपल्या वक्तृत्व शैली ने कशा गाजवायच्या हे गोपीनाथ मुंडेंना कधी सांगावे लागले नाही तशीच परिस्थिती पंकजा यांच्या बाबतीत ही आहे . आजही त्यांच्या सभांचे रेकॉर्ड कोणी तोडू शकेल असे वाटत नाही .मात्र नेता जेवढा मोठा होत जातो तेवढाच तो सत्य परिस्थिती आणि वास्तवापासून दूर जातो की काय असे वाटण्यासारखे पंकजा यांच्याबाबतीत घडू लागले ,त्यातूनच मग भगवान गडाच्या वादाचा जन्म झाला .

पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यातील मतभेद मागच्या वर्षी राज्याने पाहिले,  मात्र तरीदेखील यावर्षी भगवान गडावर दसरा मेळावा घेण्याचा अट्टहास पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी धरला होता, स्वतः पंकजा मुंडे मात्र याबाबत कमालीच्या शांत होत्या, अनेकांनी त्यांना याबाबत बोलत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी संयम ढळू दिला नाही. गड ही आपली श्रद्धा आहे अन भक्त ,समाज ही शक्ती आहेत हे त्यांनी वारंवार ठासून सांगितले. त्याच बरोबर महंत यांच्या नावे एक पत्र लिहून त्यांनी चेंडू महंतांच्या कोर्टात ढकलला ,मी लहान झाले मात्र ते ऐकत नाहीत हा  मॅसेज देण्यात त्या यशस्वी झाल्या.

साधारणपणे दोन दशकांपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी समाजाच्या उत्थानासाठी भगवान गडावर दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली, त्याचा त्यांना राजकीय आयुष्यात देखील मोठा फायदा झाला, आपल्याच नव्हे तर विरोधी पक्षात देखील त्यांनी समाजाच्या जीवावर एक दबदबा निर्माण केला होता . त्यांच्या मेळाव्यातून चेतविलेलं स्फुल्लिंग राजकीय उलथापालथी घडवून आणण्यास उपयोगी पडत असे.

मुंडे यांनी समाजाचा अत्यंत बारकाईने अभ्यास केल्याने कोठे काय बोलायचे,कधी बोलायचे हे त्यांना पक्के माहीत होते,मात्र त्यांच्या अकाली जाण्यानंतर एकाकी पडलेल्या पंकजा यांची सुरवातीला चिडचिड झाली,त्याचा फायदा घेत विरोधकांनी त्यांची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न केला अन त्यात ते यशस्वी झाले,त्यातूनच मग भगवान गडाचा वाद घडवून आणला गेला अन त्यात पंकजा मुंडे यांच्या नशिबी नको तेवढी टीका आली,वास्तविक पाहता त्याला कारण पंकजा यांचा स्वभाव देखील होताच ,मात्र वडीलकीच्या नात्यानं शास्त्री यांच्याकडून समाजाला जास्त अपेक्षा होत्या,पण त्यांनी देखील उभा दावा असल्यासारखं सुरू केलं अन त्यात गड बदनाम झाला.महंत यांनी अधिकार वाणीने या वादावर पडदा टाकणे अपेक्षित होते मात्र नियतीला कदाचित ते मान्य नसावे म्हणूनच गडावर वंजारी समाजाचे दोन गट निर्माण झाले,त्यातून पंकजा यांच्या नेतृत्वावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते .पंकजा यांच्या मागे समाज आहे की नाही असा देखील सवाल उपस्थित केला गेला .

दरम्यान यावर्षी  दसरा दोन दिवसावर आला असताना पंकजा मुंडे यांनी हा मेळावा सावरगाव या भगवान बाबा यांच्या जन्मगावी घेण्याचा निर्णय घेतला अन वादावर पडदा पडल्याचे काही जणांना वाटले,मात्र हा वाद इथेच संपेल असे वाटत नाही .कारण राजकीय आकांक्षा ,अपेक्षा एकीकडे आहेत तर दुसरीकडे धार्मिक श्रेष्ठत्व आहे, त्यामुळे हा वादाचा निखारा कायमस्वरूपी धगधगत राहणार असे आज तरी दिसते.

सावरगाव येथे अवघ्या दोन दिवसात लाखो लोक येतील अन सामावतील याची पुरेपूर काळजी घेतली गेली. नेटके नियोजन,अल्पकाळात समाजात मेळाव्याच्या नव्या स्थळाबाबत गेलेला मॅसेज यामुळे लाखो लोक याठिकाणी पंकजा काय बोलतात,कोणती भूमिका घेतात हे ऐकण्यासाठी आले होते,अगदी नाशिक,बुलढाणा,सोलापूर आशा दूरवरून लोक आले होते. मेळावा यशस्वी होणार की नाही,लोक जमतील की नाही या बाबत अनेकांच्या मनात शंका होती मात्र समाजाने पंकजा यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.

एवढ्या मोठ्या समाजासमोर काय बोलावे अशा गोंधळलेल्या अवस्थेत पंकजा यांनी जो ट्रॅक पकडला तो निश्चित पणे समाजाला दिशा देणारा असाच होता,जास्त भडक ही नाही अन जास्त मिळमिळीत ही नाही अशा पद्धतीने त्यांनी समाजाचे ब्रेन वॉश केले.संघटन कौशल्य कसे करावे हे कोणत्याही मुंडे ला कोणी सांगायची गरज नाही याची प्रचिती पुन्हा एकदा पंकजा यांच्या रूपाने दिसून  आली .आपलं अख्ख आयुष्य संघर्षात घालवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षाचा सुद्धा वारसा पंकजा या समर्थपणे चालवीत आहेत नव्हे त्यासाठी त्याच योग्य आहेत हे त्यांनी सिद्ध करून दाखवले .हुबेहूब गोपीनाथ मुंडे यांची स्टाईल,तसेच हावभाव,त्याच पद्धतीने भाषणाची लकब,हातवारे ही आता पंकजा मुंडे यांची सुद्धा ओळख होऊ लागली आहे.

उघड्या जीप मधून कार्यक्रम स्थळी आल्यानंतर  दोन्ही हाताच्या मुठी आवळून ज्या स्टाईलने त्यांनी उपस्थितांना अभिवादन केले त्यामुळे तेथे हजर असणाऱ्या लोकांमध्ये नवा जोश निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले ,त्या ज्या पद्धतीने जीप मधून उतरल्या ते पाहिल्यानंतर अनेकांना मुंडे साहेबांची आठवण झाली असेल .त्यानंतर जळगाव चे कोण आलेत,बुलढण्याचे आलेत ना अस म्हणून समोर बसलेल्या लोकांशी थेट संवाद साधण्याच त्यांचं कौशल्य दिसून आलं.सावरगाव या तशा दुर्गम भागाने काल मुंडे नावाच्या जादूचा अनुभव घेतला . पंकजा यांच्या या निर्णयामुळे सावरगाव हे  नवीन श्रद्धास्थान निर्माण होणार यात शंका नाही मात्र त्याचवेळी भगवान गड देखील समाजाच्या मनात कायम राहावा यासाठी पंकजा यांनी पुढील काळात प्रयत्न करायला हवेत .मात्र पंकजा मुंडे यांचा राजकीय स्वभाव पाहता ते कितपत होईल यात शंकाच आहे,पण अपेक्षा ठेवायला हरकत नाही,कारण उम्मीद पे दुनिया कायम है अस नेहमीच म्हटलं जातं .मेळावा रेकॉर्ड ब्रेक झाला यात शंका च नाही मात्र या मांडव वाऱ्यातून लवकर बाहेर पडून त्यांना जमिनीवर येत समाजासाठी कायम परिश्रम घ्यावे लागतील ,त्यांच्याकडून आता लोकांच्या,समाजाच्या अपेक्षा कितीतरी पटीने वाढल्या आहेत,त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना झटाव लागेल अन्यथा समाजाचा भ्रमनिरास व्हायला वेळ लागणार नाही .

COMMENTS