शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर विरोधक आक्रमक; चौथ्या दिवशीही विधानसभेचे कामकाज तहकूब

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर विरोधक आक्रमक; चौथ्या दिवशीही विधानसभेचे कामकाज तहकूब

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवर विधानसभेत चालू असलेला गोंधळ आज चौथ्या दिवशीही कायम होता. या मुद्द्यावरुन विरोधकांनी विधानसभेत गदारोळ केला. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय ऐरणीवर आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल विद्यासागर राव यांचे अभिभाषण वगळता सलग चौवथ्या दिवशीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवर विधानसभेचे कामकाज रोखून धरले. विरोधकांसह सत्ताधारी भाजप व शिवसेनेच्या आमदारांनी यावरुन प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी बुधवार पर्यंत कामकाज तहकूब केले.

आज कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी कर्जमाफीच्या घोषणांना जोरदार सुरुवात केली. शिवसेनेच्या आमदारांनी सभागृहात फलक घेऊनच प्रवेश केला. तर भाजपच्या आमदारांनी ‘ही कर्जमाफी झालीच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या.  सुरुवातीला अर्धा तास सभागृह तहकूब करावे लागले. त्यानंतर पुन्हा एकदा अर्धा तास कामकाज थांबवले गेले. मात्र तिसऱ्या वेळेला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिवस भरासाठी  कामकाज तहकूब करत असल्याचे सांगितले . ”आता पुढील तीन दिवस सभागृहाची बैठक भरणार नसून 15 मार्चला नियमित वेळेत कामकाज सुरु होईल”, असे बागडे म्हणाले.

सभागृहात गोंधळ घातल्यानंतर सेनेच्या आमदारांनी विधानभवनाच्या प्रवेशेद्वारावर व शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यासमोर धरणे दिले. यावेळी  मंत्र्यांची प्रथा मोडीत काढत शिवसेनेचे राज्यमंत्री दादाजी भुसे आणि अर्जुन खोतकर यांनीही या धरणे आंदोलनात भाग घेतला .

 

COMMENTS