विरोधकांनंतर आता मित्र पक्षही कर्जमाफीसाठी आक्रमक, राजू शेट्टींचे 28 एप्रिलपासून आंदोलन

विरोधकांनंतर आता मित्र पक्षही कर्जमाफीसाठी आक्रमक, राजू शेट्टींचे 28 एप्रिलपासून आंदोलन

कोल्हापूर – विरोधकांनी विधीमंडळात आणि विधीमंडळाच्या बाहेर शेतक-यांच्या कर्जमुक्तीच्या मुद्यावरुन सरकारला घेरलं असताना आता मित्र पक्षही शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरु आक्रमक झालेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू  शेट्टी यांनी सरकारने त्वरीत शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी अन्यथा येत्या 28 एप्रिलपासून कर्जमाफीसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. उद्योगपतींचे कर्जमाफ करता मग शेतक-यांचे कर्जमाफ करण्यास तुम्हाला काय अडचण आहे ?  असा सवालही त्यांनी सरकारला केलाय. विरोधकांची संघर्ष यात्रा ही स्वार्थासाठी आहे अशी टीकाही शेट्टी यांनी केलीय.

बळीराजाचे उत्पन्न दुप्पट करण्याचे नुसते आश्वासनच दिले गेले. त्या दिशेने मात्र कोणतीही पावले टाकली गेलेली नाहीत. तुरीचे दर 12 हजारांवरून चार हजारांवर आले, सोयाबीनचे दर अडीच हजारांवर आले. अशाने उत्पन्न दुप्पट कसे होणार?’ असा सवाल करत शेट्टी यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. शिवसेनेने यापूर्वीच कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या सुरात सूर मिसळला आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून अर्थसंकल्प सादर करण्याचा दिवस वगळता शिवसेनेने प्रत्येकवेळी सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. विरोधकांनतर आता राजू शेट्टी यांनीही आंदोलनाचा इशारा दिल्याने सरकारची अडचण होण्याची शक्यता आहे.

COMMENTS