शिवसेनेचा “हा” आमदार सुमारे 3 वर्षानंतर भेटला उद्धव ठाकरेंना !

शिवसेनेचा “हा” आमदार सुमारे 3 वर्षानंतर भेटला उद्धव ठाकरेंना !

मुंबई – शिवसेनेचे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव आज शिवसनेच्या मातोश्रीवरील बैठकीला हजर राहिले. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 2014 च्या निवडणुकीत जिंकलेल्या जाधव यांचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी मतभेद झाले होते. जिल्ह्यातील शिवसनेच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करुन घेतले जात नाही अशी त्यांची तक्रार होती. त्यामुळे जाधव हे  गेली तीन वर्ष शिवसेनेपासून दुरच होते. 

मतदारसंघातील काही उद्घाटनासाठी ते काँग्रेसच्या नेत्यांना बोलावत होते. त्यामुळे जाधव हे आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवतील अशी  शक्यता वर्तविली जात होती. मात्र आज मातोश्रीवरील शिवसेनेच्या बैठकीला जाधव हजर राहिले आणि तीन वर्षात पहिल्यांदाच ते उद्धव ठाकरे यांना भेटले. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या मध्यस्थीने जाधव हे मातोश्रीवर दाखल झाले आहेत आणि शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित राहिले आहेत.

चंद्रकांत खैरे हे मातोश्रीच्या अत्यंत जवळचे समजले जातात. तरीही जाधव यांच्याशी शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांनी जुळवून घेतल्यामुळे खैरे यांना श्रेष्ठींनी योग्य तो संदेश दिला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही दिवसांपूर्वी खैरेच्या ‘त्या’ अस्तित्वात नसलेल्या गावांवर विकास निधी खर्च केल्याचं प्रकरण जाधव यांनीच उघड  केलं होतं.

 

COMMENTS