शुल्कवाढीवरुन संतप्त पालकांनी पुन्हा तावडेंना घेरले

शुल्कवाढीवरुन संतप्त पालकांनी पुन्हा तावडेंना घेरले

पुणे : पुण्यात खासगी शाळा या बेकायदेशीरपणे शुल्कवाढीवर कुठलीही कारवाई होत नसल्याने आज पुन्हा पालकांनी पुण्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना घेरले.

यावेळी एका महिलेनं शिक्षणमंत्र्यांना घेरत म्हटले,’ प्रसारमाध्यमांसमोरच आमच्याशी बोला. केवळ मोठी भाषणे करुन होणार नाही. पालकांचे प्रश्न ही सोडवा. त्यावर विनोद तावडे यांनी शुल्कवाढ केलेल्या सात शाळांची सोमवारी मुंबईत सुनावणी घेणार असल्याचे पालकांना सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार ,’ विनोद तावडे हे फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये अखिल भारतीय विज्ञान संमेलनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पुण्यात आले होते. यावेळी पालकांनी त्यांना घेरले. त्यानंतर फर्ग्युसनमधे संतप्त पालक आणि विनोद तावडे यांच्यात बैठक झाली. यावेळी सुनावणीबाबत तावडे यांनी माहिती दिली. शाळांचे प्रतिनिधी, पालक आणि मी स्वत: अशी ती सुनावणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विनोद तावडे यांनी सांगितले, ‘शुल्कवाढी संदर्भात पुण्यातील 18 शाळांच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्यांना सुनावणीसाठी मुंबईला बोलावण्यात आले आहे. या सुनावणीमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल. शाळांमधूनच पुस्तके व इतर शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जाऊ नये याबाबतच्या सूचना पालकांना देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी शाळांविरोधात ग्राहक न्यायालयामध्ये दाद मागण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे’.

COMMENTS