शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधकांची चांदा ते बांदा संघर्ष यात्रा !

शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधकांची चांदा ते बांदा संघर्ष यात्रा !

मुंबई – शेतकरी कर्जमाफीबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याने विरोधी पक्ष आता रस्त्यावर उतरणार असून, 29 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह विधिमंडळातील सर्वच विरोधी पक्ष चांदा ते बांदा राज्यव्यापी संघर्ष यात्रा काढणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी दिली आहे.

विधानसभेत शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या 19 आमदारांना 31 डिसेंबर 2017 पर्यंत निलंबीत करण्यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव मांडला होता. ही सरकारची दडपशाही असून, शेतकरी कर्जमाफीची मागणी व सरकारकडून सुरू असलेल्या मुस्कटदाबीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचे विरोधी पक्षांनी निश्चित केले आहे. या यात्रेचा विस्तृत कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल.

या संदर्भात तत्पूर्वी झालेल्या विरोधी पक्षांच्या आमदारांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण,दोन्ही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण,माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार,विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते आ. गणपतराव देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील,शेकापचे नेते आ. जयंत पाटील, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे,समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू आसिम आझमी, पीरिपाचे अध्यक्ष आ. जोगेंद्र कवाडे, एमआयएमचे इम्तियाज जलील,लोकभारतीचे आ. कपिल पाटील यांच्यासह विरोधी पक्षातील बहुसंख्य आमदार उपस्थित होते.

COMMENTS