सामुहिक बलात्कार प्रकरणी समाजवादी नेता गायत्री प्रजापती अटकेत

सामुहिक बलात्कार प्रकरणी समाजवादी नेता गायत्री प्रजापती अटकेत

समाजवादी पक्षाचे नेते आणि अखिलेश सरकारमधील मंत्री गायत्री प्रजापती यांना सामुहिक बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. लखनौमधून प्रजापती यांना अटक केल्याची माहिती उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक जावेद अहमद यांनी दिली आहे. गायत्री प्रजापती यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

गायत्री प्रजापती आणि इतर सहा जणांवर एका महिलेवर सामुहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गायत्री प्रजापती फरार होता. उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक जावेद अहमद यांनी याविषयी माहिती दिली. गायत्री प्रजापती फरार असताना काही दिवस दिल्लीजवळ, तर त्यानंतर काही दिवस हरियाणाजवळ राहत होते. लखनौहून आज सकाळीच प्रजापती यांना अटक करण्यात आली. सामुहिक बलात्कार प्रकरणात प्रजापती यांच्यासोबत आरोपी असलेले अमरेंद्र उर्फ पिंटू, रुपेश्वर आणि विकास वर्मा यांना लखनौमधील हजरतगंज परिसरातून 14 मार्चला अटक करण्यात आली होती. या गॅंगरेप प्रकरणात गायत्री प्रजापती यांचे गनर चंद्रपाल, लेखापाल अशोक तिवारी आणि आरोपी आशिष शुक्‍ला यांनाही याआधी अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणातील सर्व आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. सहा महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने गायत्री प्रजापती यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय दिला होता. शिवाय, सर्वोच्च न्यायालयाने प्रजापती यांची याचिकाही फेटाळली होती. या याचिकेतून प्रजापती यांनी अटकेतून सुटका मिळावी, अशी मागणी केली होती. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अमित शाह म्हणाले होते, सरकार आल्यावर सर्वात आधी गायत्री प्रजापतीला तुरुंगात पाठवू आणि शहा यांनी बोलल्या प्रमाणेच केल्याचे दिसत आहे.

COMMENTS