‘सेव्ह वॉटर’चा संदेश देण्यासाठी डबेवाल्यांचा फ्लॅशमॉब

‘सेव्ह वॉटर’चा संदेश देण्यासाठी डबेवाल्यांचा फ्लॅशमॉब

22 मार्च “सेव्ह वॉटर डे ” दिनाच्या पुर्व संध्येला आज (दि.21) डबेवाल्यांनी चर्चगेट स्टेशन बाहेर “फ्लॅशमॉब” या आधुनिक पध्दतीचा अवलंब करून पारंपारिक वाद्याची सह्याने फ्लॅशमॉब केला. यातून सेव्ह वाटर संदेश डबेवाल्यांकडून देण्यात आला.

भविष्यात जर तिसरे महायुद्ध झाले तर ते पाण्यासाठी होईल असे जगभरातले शास्त्रज्ञ, संशोधक आणि विचारवंत यांचे म्हणणे आहे. आणि ते शंभर टक्के खरेही आहे. कारण पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही. असे असताना मात्र दिवसेंदिवस पाण्याची टंचाई वाढू लागली आहे. हळूहळू पाण्याची समस्या भीषण स्वरूप धारण करू लागली आहे. यावर वेळीच योग्य ती उपाययोजना केली गेली नाही तर समस्त जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात येणार यात शंका नाही.

पाणी टंचाईचे दुष्परिणाम या ना त्या कारणाने आता जगभर जाणवू लागले आहेत. एकीकडे जल प्रदूषणाचा अतिरेक, पृथ्वीचे वाढणारे तापमान, निसर्गाचे बदललेले ऋतूचक्र, पर्जन्याचे कमी होत जाणारे प्रमाण, वारंवार निर्माण होणारा दुष्काळ, तर दुसरीकडे वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, पाण्याचा मर्यादित साठा, भरमसाठ होणारा अपव्यय या आणि अशा अनेक कारणांमुळे केवळ मानवजातच नव्हेतर पृथ्वीवरील एकूण जीवसृष्टीच धोक्याच्या सीमेवर येवून उभी राहिली आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन समस्त मानव जातीने पाण्याबाबत जागृत होऊन स्वच्छ व पिण्यास योग्य अशा पाण्याच्या संवर्धनासाठी योग्य त्या उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे!

एकूणच पाणी टंचाईच्या समस्याचे भीषण वास्तव लक्षात घेऊनच 22 मार्च रोजी साजरा करण्यात येणाऱ्या जागतीक जल दिनाचे औचित्य साधत जल संवर्धन करा असा संदेश मुंबईचा डबेवाल्यांकडून आज देण्यात आला.

पाणी संवर्धनासाठी वेळीच उपाययोजना केली गेली नाही तर भविष्यात निर्माण होणाऱ्या संकटाची चाहूल ओळखूनच लोकांमध्ये पाण्याबाबत जागृती निर्माण व्हावी म्हणून, सन 1992  साली रिओ दी जॅनेरो येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकास परिषदेत आंतरराष्ट्रीय पातळीवर दरवर्षी 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. खरेतर पृथ्वीवर एकूण 70 टक्के भाग हा जलमय आहे. परंतु एवढा मोठा प्रचंड पाणी साठा या पृथ्वीवर उपलब्ध असतानाही यापैकी अगदी थोड्याच प्रमाणात जीवसृष्टीला पिण्यास योग्य असणारे गोडे पाणी पृथ्वीवर उपलब्ध आहे. त्यातही जवळपास 75  टक्के गोडे पाणी ध्रुवीय प्रदेशात गोठलेल्या अवस्थेत तर जवळपास 22 टक्के पाणी पृथ्वीच्या भूगर्भात आहे. यापैकी अगदीच थोडे पाणी वापरण्याकरिता उपलब्ध आहे. उरलेले पाणी नदी, तलाव व जलाशय यामध्ये आहे. या उलट पृथ्वीवर लोकसंख्या, उद्योगधंदे यांची संख्या मात्र दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. त्या अनुषंगाने प्रतिदिन एका छोट्या कुटुंबाला सरासरी 30 ते 50 लिटर  स्वच्छ आणि सुरक्षित पाण्याची गरज भासते. एकूण पृथ्वीचा विचार करता जगामध्ये दरवर्षी जवळपास दीड हजार पेक्षा अधिक क्युबिक किलोलीटर्स सांडपाणी तयार होते. आणि त्याही पेक्षा वाईट म्हणजे हे पाणी गोड्या पाण्याचा अपव्यय होऊन निर्माण झालेले असते.

म्हणूनच आपल्याला पाणी संवर्धनासाठी सतर्क राहणे आवश्यक असून, नदी, ओढा, तलाव, विहीर अशा जलस्त्रोतांना प्रदूषणमुक्त व स्वच्छ, सुरक्षित ठेवणे आपले महत्वाचे कर्तव्य आहे. त्याच बरोबर पावसाच्या पाण्याचेही  जल संवर्धन होणे गरजेचे आहे. अगदी छोट्या छोट्या बाबींची दक्षता जर आपण घेतली तर ही गोष्ट अशक्य मात्र मुळीच नाही. उदा. पाण्याच्या ठिकाणी गोरेढोरे धुणे तसेच धुनीभांडी करणे टाळायला हवे. त्याचबरोबर सांडपाण्याचा योग्य निचरा करणे व सर्वात महत्वाचे म्हणजे कचरा निर्माल्ये टाकून नद्या प्रदूषित करू नयेत.  कारण पाण्याच्या जागृतीबाबत केवळ शासन पातळीवरच प्रयत्न करून चालणार नाही तर सामान्य माणसाचाही यासाठी महत्वाचा सहभाग आवश्यक आहे. या लोकसहभागातून जलसमृद्धी साधता आली तरच पाणी वाचेल पर्यायाने जीवन वाचेल !

COMMENTS