11 वेळा आमदार होऊन देशात विक्रम करणाय्रा नेत्याच्या नातवाला जनतेनं नाकारलं!

11 वेळा आमदार होऊन देशात विक्रम करणाय्रा नेत्याच्या नातवाला जनतेनं नाकारलं!

सोलापूर –  विधानसभा निवडणुकीचा निकाल काल लागला. या निवडणुकीत अनेकांना पराभव पत्करावा लागला तर अनेकांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. या निवडणुकीत अनेकांच्या गडाला सुरुंगही लागला आहे. सांगोला मतदारसंघातही तब्बल अकरा वेळा आमदार होण्याचा मान मिळवणाऱ्या 94 वर्षीय गणपतराव देशमुख यांचा गड गेला आहे. यावेळी गणपतराव देशमुख यांनी निवडणूक न लढवता आपल्या नातवाला मैदानात उतरवलं होतं. नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना या निवडणुकीत अपयश आलं आहे. याठिकाणी शिवसेनेचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांनी बाजी मारली आहे.

शिवसेनेचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांना 99 हजार 464 मतं मिळाली, तर अनिकेत देशमुख यांना 98 हजार 696 मतं पडली. त्यामुळे अनिकेत देशमुख यांना या अटीतटीच्या लढतीत 768 मतांच्या फरकामुळे निसटता पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे या मतदारसंघात नातवाला आपल्या आजोबांचा गड राखता आला नसल्याची चर्चा आहे.

दरम्यान देशमुख हे देशातून 11 वेळा विजय मिळवणारे पहिले आमदार आहेत. 1962 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. 1972 आणि 1995 चा अपवाद वगळता, ते सातत्याने विजयी झाले. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी दहा वेळा विजयी झाले होते. 2009 च्या निवडणुकीत विजय मिळवून करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी हा विक्रम मोडित काढला होता. या निवडणुकीतही ते मैदानात उतरले असते तर जिंकले असते अशी चर्चा आहे. परंतु देशमुख यांनी स्वत:हून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.

COMMENTS