अहमदनगर – भाजपला धक्का, माजी उपसभापतींसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

अहमदनगर – भाजपला धक्का, माजी उपसभापतींसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

अहमदनगर – भाजपला धक्का बसला असून माजी उपसभापतींसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत माजी उपसभापती संभाजीराव पालवे यांनी शेकडो समर्थकांसह भाजपमधून राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.यावेळी धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.हर हर मोदी घर घर मोदी असा नारा देणाऱ्या मोदी सरकारला आता शेवटची घरघर लागली असल्याची जोरदार मुंडे यांनी केली आहे. तसेच राज्यातील शासनाला उलथवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचंही मुंडे यांनी म्हटलं आहे.पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथे शिवनेरी मंगल कार्यालयाचे उद्घाघाटन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन मुंडे यांचे उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे तर प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अँड. प्रताप ढाकणे, जि.प. सदस्य शिवाजी गाडे, गोविंद मोकाटे, काँग्रेसचे हिंगोली जिल्हा प्रभारी दादासाहेब मुंडे, माजी जि.प. अध्यक्ष बाबासाहेब भिटे, जेष्ठ नेते काशिनाथ लवांडे, संदिप वर्पे, माजी जि.प. सदस्य मोहन पालवे, शिवशंकर राजळे, माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके, बाजार समीतीचे माजी सभापती गाहिनीनाथ शिरसाठ, राहुरीच्या सभापती मनिषा ओव्हळ, निर्मला मालपाणी, संजय कोळगे,रघुनाथ झिने, आदीसह राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा नामोल्लेख टाळून शेलक्या शब्दात टीका केली. या वेळी बोलताना मुंडे म्हणाले कि तीन दिवसांपूर्वी परळी येथे झालेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी आपण आई असलेल्या परळी व मावशी असलेल्या पाथर्डी तालुक्यात काय विकास केला याचा पाढा वाचण्याऐवजी माझ्यावर टीका केली मात्र स्व. गोपीनाथ मुंडे यांचा खरा वारसा आपण चालवत असून त्यांनी जो संघर्ष केला तसा संघर्ष आपण करत आहोत. परळीचे नेते निवडणूक आली कि तुमच्याकडे येतील अन बाबांच्या आठवणी सांगत रडतील पण आता फसवणूक होऊ देऊ नका. मी पाथर्डी तालुक्याला कधीही अंतर देणार नाही. जे प्रेम स्व. मुंडे यांनी तुम्हाला दिले ते प्रेम मी तुम्हाला देईल. मागच्या निवडणुकीत थोड्या मताने मी पडलो असलो तरीही खचलो नाही. मोदी लाटेत अनेकजण पडले असले तरीही आता घरवापसी सुरु झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांची निव्वळ फसवणूक केली. महागाई वाढली, बेकारांना नोकऱ्या नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर, मुस्लिम ,लिंगायत समाजाला झुलवत ठेवले. अच्छे दिनच्या नावाखाली तरुणाईला वेड करून अक्षरश नाचायला लावले. जनतेने सरकारला जागा दाखवण्याचे ठरवून पाच राज्यांमध्ये सत्ता उलथून टाकली. या निकालानंतर “देश बदल रहा है ” अशी जाहिरात सुद्धा बंद झाली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत परिवर्तन अटळ असुन जनतेतील नाराजीची लाट सरकारला घरी बसल्या शिवाय राहणार नाही. धनगर समाजातील प्राध्यापक राम शिंदे व महादेव जानकर या दोघांना आरक्षण देऊन अन्य समाजाची शासनाने घोर फसवणूक केली. सपनोका सौदागर म्हणून स्वतःची प्रतिमा मोदींनी देशाला दाखवली. ती प्रतिमा तरुणाईकडून धुळीस मिळवल्या शिवाय राहणार नाही. धुळे व नगर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी करण्यास माणसे मिळाली नाही. म्हणून बाहेरच्या पक्षातील उमेदवारांना पाळण्यात बसविले. तुमच्या घरात पाळणा हालत नाही तर शेजारच्या घरातील पोरांना पाळण्यात बसून बारसे साजरे करण्याचा प्रयत्न लोकांच्या लक्षात आला असल्याचा टोला त्यांनी शेवटी लगावला .

COMMENTS