नगरमध्ये आघाडीला धक्का, काँग्रेस – राष्ट्रवादीत फूट !

नगरमध्ये आघाडीला धक्का, काँग्रेस – राष्ट्रवादीत फूट !

अहमदनगर – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरमध्ये आघाडीला धक्का बसला असून काँग्रेस-राष्ट्रवादीत फूट पडली आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार असलेल्या सुजय विखे पाटील यांना पाठिंबा देण्याची घोषणा नगर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब हराळ यांनी केली आहे. त्यामुळे याठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीत फूट पडली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येत लढत असताना, नगरमध्ये मात्र जिल्हा काँग्रेसने थेट भाजपला मदत करण्याची घोषणा केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांनी आमचे उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न केले.त्यावेळी डॉ सुजय विखे पाटील यांनी आमचा प्रचार करुन आमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. या भूमिकेवर आमच्याशी काँग्रेसने संपर्क साधला नाही. ज्या माणसाने आमची माणसं निवडून येण्यासाठी प्रयत्न केले, त्या माणसाच्या पाठिशी उभं राहणं आमचं कर्तव्य असल्याचं बाळासाहेब हराळ यांनी म्हटलं आहे.

तसेच राज्यात आघाडी आहे. त्यामुळे आघाडीचा धर्म सर्वांनी पाळला पाहिजे. नगरमधील घटनेत सत्यता असेल, तर कारवाई करणार असल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

COMMENTS