हे नालायक, हरामखोर शरीरसुखाची मागणी कशी करू शकतात, त्यांच्या घरी आया बहिणी नाहीत का ? – अजित पवार कडाडले !

हे नालायक, हरामखोर शरीरसुखाची मागणी कशी करू शकतात, त्यांच्या घरी आया बहिणी नाहीत का ? – अजित पवार कडाडले !

नागपूर – पीक कर्ज देण्यासाठी बँकेच्या अधिका-यांनी शेतक-यांच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले असल्याचं पहावयास मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी याबाबत त्या अधिका-यांवर आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे नालायक, हरामखोर शरीरसुखाची मागणी कशी करू शकतात, त्यांच्या घरी आया बहिणी नाहीत का ? असं म्हणत अजित पवार हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन चांगलेच चिडले असल्याचं पहावयास मिळालं आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पत्नीकडून शरीरसुखाची मागणी करणा-यांना फाशीची शिक्षा देण्याचा कायदा आणण्याची मागणीही यावेळी अजित पवार यांनी केली असून हे राज्य सरकारला जमत नसेल तर केंद्राला प्रस्ताव पाठवा असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यवतमाळ, बुलढाण्यामधील शेतक-यांच्या पत्नीकडे कर्ज देण्यासाठी बँक अधिका-यांनी शरीरसुखाची मागणी केली होती. त्यानंतर राज्यभर पडसाद उमटले होते. त्यामुळे या प्रकरणांचा मुद्दा आज अजित पवार यांनी उचलला आहे. राज्यातील ही दोन प्रकरणं समोर आली असून अजून अशा किती घटना घडल्या असतील हे माहीत नाही. कारण त्या बहिणी घाबरल्या असतील, गप्प बसले असतील असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 विमा कंपन्यांना मोठा फायदा

पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही.  त्यांनाच फायदा झाला असून रिलायन्स कंपनीला 809 कोटींचा विमा मिळाला. त्यापैकी शेतकऱ्यांना 105 कोटींची भरपाई दिली असून यामध्ये कंपनीला 704 कोटींचा फायदा झाला असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 शेतक-यांची थट्टा लावलीय का ?

बीड जिल्ह्यातील शेतक-यांना एक रुपये, दोन रुपये, पाच रुपये असा पिक विमा देण्यात आला आहे. त्यामुळे या शेतक-यांची थट्टा लावली आहे का ? असा सवालही अजित पवार यांनी केला आहे. तसेच जीवावर निवडून इथे बसलात आणि शेतकऱ्यांची थट्टा करतात.  तुंबड्या भरायचं काम विमा कंपन्यांनी सुरु केलं आहे. विमा कंपन्यांनी स्वतःची चांदी करून घेत शेतक-यांची माती केली असल्याची टीकाही पवार यांनी यावेळी केली आहे.

 

COMMENTS