मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट इमारत व परिसराच्या हेरिटेज सौंदर्यवृद्धीसाठी दोनशे कोटींचा निधी – अजित पवार

मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट इमारत व परिसराच्या हेरिटेज सौंदर्यवृद्धीसाठी दोनशे कोटींचा निधी – अजित पवार

मुंबई – मुंबई विद्यापीठाची फोर्ट येथील इमारत व परिसराचे मूळ कलात्मक (हेरिटेज) सौंदर्य पूर्ववत जतन करुन तेथील निसर्गसंपदा वृद्धींगत करण्यात येणार असून त्यासाठी दोनशे कोटींचा निधी चार वर्षात टप्प्याटप्याने उपलब्ध करण्याचा निर्णय उपमुख्ममंत्री अजित पवार यांनी आज जाहिर केला. उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार सुप्रिया सुळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मुंबई विद्यापीठाला १६० वर्षांचा ऐतिहासिक आणि गौरवशाली वारसा आहे. विद्यापीठाच्या इमारतीचं सौंदर्य व परिसराला जागतिक वारशाचं महत्वं आहे. मुंबई शहर आणि शहरातील इमारतीचं सौंदर्य खुलवण्याच्या दृष्टीनं विद्यापीठ इमारत व परिसराला मूळ सौंदर्य बहाल करुन तेथे शिकणाऱ्या व भेट देणाऱ्या नागरिकांना आनंददायी वातावरण उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुंबई विद्यापीठाचा चेहरामोहरा बदलून जाणार आहे. यानिर्णयांतर्गत यावर्षी पहिल्या टप्प्यात पन्नास कोटी देण्यात येणार आहेत. मुंबई विद्यापीठ आण एमएमआरडीए यांच्या समन्वयातून यासंदर्भातील आराखडा तयार करुन त्याची अंमलबजावणी होणार आहे.

फोर्ट कॅम्पस्प्रमाणे विद्यापीठाच्या कालिना येथील इमारतींची सौंदर्यवृद्धी, परिसराची स्वच्छता, वृक्षलागवड, अतिक्रमण निर्मूलन, शैक्षणिक सुविधांचा विकास आदींबाबतही बैठकीत चर्चा झाली. कालिना तसेच राज्यातील विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करणे तसेच शैक्षणिक सुविधा विकसित करण्यासंदर्भातही यावेळी निर्णय घेण्यात आले.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले की, मुंबई विद्यापीठाचा मागील आठवड्यात आढावा घेतला असता विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना डिजीटल आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. बैठकीला वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर, प्र- कुलगुरु प्रा. रविंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.

COMMENTS