अजित पवार यांची सरकारवर जोरदार टीका !

अजित पवार यांची सरकारवर जोरदार टीका !

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. नागपूरमध्ये अधिवेशन कुठल्या कारणासाठी घेण्यात आलं याचं उत्तर आम्हाला मिळत नाही. तो कुणाचा हट्ट-बालहट्ट होता?  असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. तसेच नागपूरमध्ये अधिवेशन घेण्यास आमचा विरोध नाही. पण तिथे सगळाच भोंगळ कारभार आहे. काही व्यवस्था नाही. वीज नाही म्हणून कामकाज होऊ शकले नाही. मुहूर्त पाहून सोमवार ऐवजी बुधवारपासून अधिवेशन सुरु केलं असल्याचं कळलं. आपण कुठल्या काळात आहोत मुंबईतील जमिनीबाबत गैरव्यवहार झाला नाही असं काल सांगितलं आणि आज त्या व्यवहाराला स्थगिती दिली, याचा अर्थ काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान नागपूरपणे आज सगळीकडे पाणी साचलय. नालेसफाई झाली नसल्यानं ही अवस्था ओढवली. मुंबईत समुद्र आहे म्हणून तिथे पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. पण नागपूरमध्ये तसं काही कारण नाही. लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला. नागपूरपासून दिल्लीपर्यंत भाजपचेच सरकार आहे. तरीदेखील तिथे पाणी तुंबलं याला कोण जबाबदार आहे. अधिवेशन परिसरात दारूच्या बाटल्या सापडल्या, काय चाललंय हे ? असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शेतीमालाला दिडपट हमी भाव हा चुनावी जुमला आहे. लबाडाघरचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही. त्यांची ती क्षमताच नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही घोषणा केली असून त्यांनी एवढी घाई केल्यामुळे लोकसभा निवडणूका लवकर घेण्याचा डाव आहे की काय अशी शंका येत असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS