…याला शहाणपण म्हणत नाहीत, भाजपच्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया!

…याला शहाणपण म्हणत नाहीत, भाजपच्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया!

मुंबई – स्वत:च्या घराच्या अंगणालाच ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाही. आज, महाराष्ट्रातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, राज्याचा प्रत्येक नागरिक जोखीम पत्करुन कोरोनाविरुद्ध शर्थीनं लढत असताना त्यांच्या प्रयत्नांना ताकद देण्याऐवजी काळे झेंडे, काळे निषेध फलक फडकवून आंदोलन करणं हा समस्त कोरोना योध्दांचा, महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. महाराष्ट्र कोरोनाविरुद्धची एकजुटीनं लढाई लढत असताना अशा आंदोलनातून या लढाईत अडथळे निर्माण करण्याचा, महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न राज्यातील जनताच हाणून पाडेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुकारलेले काळे झेंडे आंदोलन हे अवेळी पुकारलेले, अनाकलनीय आंदोलन आहे. या आंदोलनातून महाराष्ट्राचं आणि भाजपचं काहीही भलं होणार नाही. राज्यातील प्रत्येक जण कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देत असताना अशा पद्धतीचं ‘काळं’ आंदोलन करण्याची कल्पना कुणाच्या डोक्यात कशी येऊ शकते, हा राज्याला पडलेला प्रश्न आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. कोरोनाविरुद्धची लढाई संपूर्ण महाराष्ट्र एकजुटीने लढत असून सर्व आव्हानांवर मात करुन ही लढाई आपण नक्की जिंकूच असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

मुंबईसह महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या गेल्या आहेत. आरोग्य सेवा सक्षम करण्यात आली आहे. मुंबईतील झोपडपट्टया, दाट लोकवस्ती तसेच इतर सर्व आव्हानांवर मात करुन आपल्याला ही लढाई जिंकायची आहे. गेल्या महिन्यात काही संस्थांनी संभाव्य आकडेवारीनुसार १५ मेपर्यंत मुंबईत साडेसहा लाख कोरोना रुग्ण असतील असा अंदाज वर्तवला होता. आज आपल्या राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा ४० हजारांच्या आत आहे. त्यांच्यापैकी १० हजार रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी परतले आहेत. राज्याने गेला सव्वा महिना सहा लाखांहून अधिक परप्रांतीय मजूरांच्या निवास, भोजन आणि वैद्यकीय उपचारांची सोय केली. आजमितीला ५ लाख परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यात सुखरुप परतले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक यंत्रणा, प्रत्येकजण आपापल्या परीने या लढाईत सहभागी झाला आहे.

महाराष्ट्र राज्य या आव्हानांचा यशस्वी सामना करत असताना भाजपने ‘काळे झेंडे’सारखे आंदोलन करुन महाराष्ट्रातील कोरोना योध्दांचा अपमान करुन नये. कोरोनाविरुद्धच्या लढाईत अडथळे आणू नयेत. भाजपने काळे झेंडे आंदोलन मागे घेऊन कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हावे, महाराष्ट्रविरुध्दच्या कटाचा भाग बनण्याचं पाप माथी घेऊ नये, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

COMMENTS