पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नारळ फोडला हे कुणाला पटले नाही का ? – अजित पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नारळ फोडला हे कुणाला पटले नाही का ? – अजित पवार

मुंबई – राज्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते  धनंजय मुंडे व राष्ट्रवादीचे प्रमुख प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांवरुन सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. शिवस्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. मग काम सुरू करण्याऐवजी पुन्हा पुन्हा तिथे जाण्याचे कारणच काय? कुणाला स्वतःचं महत्त्व वाढवायचं होतं का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारळ फोडला हे कुणाला पटले नाही का, असा खरमरीत प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे.

दरम्यान कर्जमाफीला १४ महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला मात्र अजूनही यादी फायनल झाली नाही. शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. आम्हाला या विषयात राजकारण आणायचे नाही, सरकारला आम्ही मदत करायला तयार आहोत. परंतु शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे हीच आमची भूमिका असल्याचंही यावेळी अजित पवार यांनी स्पष्ट केले.

३३ टक्के वीजबिल माफ असे सरकार म्हणते मात्र महावितरण अजूनही बीलं पाठवतच आहे. कोळशाबाबत समन्वय साधावा तर सरकार म्हणतंय की कोळसा नाही. सणांच्या दिवशी लोकांना अंधारात ठेवण्याचे काम सरकार करत आहे. सरकारने भारनियमन ताबडतोब रद्द करावे, अशी मागणीही यावेळी अजित पवार यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले होते की जलयुक्त शिवार योजनेमुळे साडेसोहळा हजार गावांना पाणी मिळाले. हा दावा खोटा आहे. सरकारने गाजावाजा करत ही योजना आणली. मात्र कामे झाली असल्याचे दिसत नाही. मग साडे सात हजार कोटी गेले कुठे, असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला.

राज्यात अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती आहे. १९७२ हूनही भयंकर दुष्काळ परिस्थिती आज निर्माण झाली आहे, मात्र सरकार दुष्काळ घोषित करत नाही. सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणीही यावेळी अजित पवार यांनी केली आहे.

 

 

COMMENTS