मोहन भागवतांचे भाषण – ‘द हिंदू’चे पत्रकार अलोक देशपांडे यांनी केलेले विश्लेषण !

मोहन भागवतांचे भाषण – ‘द हिंदू’चे पत्रकार अलोक देशपांडे यांनी केलेले विश्लेषण !

मुंबई – मोहन भागवत यांच्या तथाकथित inclusive भाषणाबाबत एव्हढे आश्चर्य का वाटावे? ते जे काही बोलत आहेत तो मुखवटा घालून गेली कित्येक वर्ष संघ वावरत आला आहेच. स्वतःच्या तोंडून काही न बोलता, आपल्या पिल्लांना जातीयवादी आणि धर्मांध वक्तव्ये बोलायला लावायची आणि आपला कार्यभाग उरकून घ्यायचा, परंतु स्वतः मात्र नामानिराळे राहायचे हीच कार्यपद्धती संघ वापरत आला आहे. मुद्दा हा आहे की निवडणुका काही महिन्यांवर आल्या असताना संघाला हे का बोलावे लागत आहे? जर का कोणी या भ्रमात असेल की मोदींना संघाने ‘सुनावले’ वगैरे तर कृपया त्यातून बाहेर या. इथे प्रत्येक खेळी calculated असते.

आज एक मोठा वर्ग, ज्याने प्रामाणिकपणे काँग्रेसला कंटाळून भाजपला मत दिले मात्र हिंसक हिंदुत्व किंवा गाय किंवा लव्ह जिहाद किंवा घरवापसी असल्या गोष्टीत ज्याला काडीचाही रस नाही, भ्रमनिरास होऊन आपल्या हातातून निसटत आहे की काय अशी साधार भीती सत्ताधारी पक्षाला वाटत आहे. अशा वर्गाला परत आपल्याकडे खेचण्यासाठी जे आर्थिक उपाय केले पाहिजेत, म्हणजे इंधनाचे भाव आटोक्यात आणणे किंवा नोकऱ्या किंवा शेतीवर खर्च वाढवणे वगैरे वगैरे अशा सर्वच आर्थिक पातळीवर सरकार अपयशी ठरत आहे. अगदी पाकिस्तानला ठेचणे वगैरे सुद्धा अजून खूप दूर आहे.

मग राहुल गांधी आणि इतर विरोधकांची inclusive विकासाची साद त्या वर्गाला पटली तर? जर हे टाळायचे असेल तर तुम्ही एकाच परिवारातून एक आक्रस्ताळा आणि एक दाखवण्यापूरता समंजस आवाज देणे गरजेचे आहे. आक्रस्ताळे अनंत आहेत, दुसऱ्या आवाजाचे प्रतिनिधित्व भागवत केल्याचे दाखवत आहेत.

गेल्या 4 वर्षात देशात अशा असंख्य घटना घडल्या जेव्हा संघ आज जे बोलत आहे तेव्हा ते बोलणे गरजेचे होते. परत आज जे संघ बोलत आहे ते देखील धर्म, संस्कृती, देशप्रेम याच्या पलीकडे जाताना दिसत नाही. म्हणज देशासमोरील आर्थिक आव्हानांचा विचारही या भाषणांत दिसत नाही. शेवटी गोल-गोल करून हिंदुराष्ट्र आणि मुस्लिम यावरच चर्चा केंद्रित होते. संघाला आपण उदारमतवादी असल्याचे सतत बोलायला लागते याचा विचार आज राजकीय अंगाने करणे गरजेचे आहे, मोदींना सुनावले या भोळसटपणातून नाही.

COMMENTS