आमच्या संकल्प शक्तीचा कोणी पराभव करु शकत नाही – अमित शाह

आमच्या संकल्प शक्तीचा कोणी पराभव करु शकत नाही – अमित शाह

नवी दिल्ली – दिल्लीत आजपासून सुरू झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आगामी निवडणुकीत आमचाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. आम्ही २०१९ मध्ये केंद्रात पुन्हा पूर्ण बहुमताने सत्तेत येऊ. आम्ही जो संकल्प केला आहे; त्या संकल्प शक्तीचा कोणी पराभव करू शकत नाही, असा दावा अमित शाह यांनी केला आहे.

दरम्यान पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक आज सुरू झाली आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुका हाच मुख्य अजेंडा आहे. तसेच मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांतील विधानसभा निवडणुकीत पक्षाची रणनिती या बैठकीत ठरविली जाणार आहे.

सध्या देशात केंद्र सरकारने अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात केलेल्या दुरुस्तीच्या निर्णयाविरोधात सवर्णांच्या संघटनांनी एल्गार केला आहे. त्यामुळे या संवेदनशील मुद्यावर भाजप सावध भूमिका घेण्याची शक्यता आहे. कोणत्याही एका समाजाच्या बाजूने भूमिका न घेता सलोखा राखण्याचा संदेश या बैठकीतून दिला जाणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान नक्षलवाद्यांवर कारवाई आणि त्याचे परिणाम, काश्मीर मुद्दा यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळी भाजप अध्यक्ष अमित शहा राज्यांच्या निवडणुकीसंदर्भात आपला अहवाल सादर करणार आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या जनधन, उजाला, उज्ज्वला, पीक विमा, आयुषमान भारत आदी कल्याणकारी योजनांवर बैठकीत भर दिला जाणार असल्याची माहिती आहे.

 

 

 

COMMENTS