ठाण्यातील तरे नावाचे वलय हरपले

ठाण्यातील तरे नावाचे वलय हरपले

ठाणे: शिवसेना उपनेते व माजी आमदार अनंत तरे यांचे आज ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. अनंत तरे यांच्यावर मागील दोन महिन्यांपासून उपचार सुरू होते. मात्र, सतत त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यातच आज त्यांची प्राणज्योत मालवली. मेंदूतील रक्तस्त्रावामुळे अनंत तरे यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सायंकाळी पावणेपाच वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. तरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन नातवंडे व भाऊ असा परिवार आहे. तरे यांच्या पार्थिवावर उद्या (मंगळवार) दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ठाण्यात अनंत तरे या नावाला एक वलय होतं. एकेकाळी ठाण्याच्या राजकारणात तरे यांचा दबदबा होता. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तरे यांचा नेहमीच सन्मान केला. म्हणूनच तरे यांना तीनवेळा ठाण्याचे महापौरपद भूषवण्याचा मान मिळाला. शिवसेनेचे ते गेल्या अनेक वर्षापासून उपनेते होते. विधान परिषदेवरही ते निवडून गेले होते. महादेव कोळी समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडत त्यांनी अनेक आंदोलने केली होती. अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे ते अध्यक्ष होते. कार्ला येथील एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. कामगार क्षेत्रातही तरे यांनी आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला होता. ठाणे, नवी मुंबई परिसरातील अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी कामगारांच्या हिताचे करार घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.

COMMENTS