परराज्यातील मजुरांबाबत राज्य सरकार ऐतिहासिक निर्णय घेणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती !

परराज्यातील मजुरांबाबत राज्य सरकार ऐतिहासिक निर्णय घेणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती !

मुंबई – परराज्यातून राज्यात आलेले अनेक मजूर कोरोनामुळे परत त्यांच्या राज्यात गेले आहेत. त्यानंतर आता लॉकडाऊन संपल्यानंतर हे मजूर पुन्हा राज्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात परराज्यातून येणाऱ्या मजुरांबाबत नवे धोरण आखण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यात येणाऱ्या परप्रांतीय मजुरांच्या नोंदणीबाबत धोरण ठरविण्यासाठीच्या चर्चा सुरू असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.येत्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेऊ, असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान स्थलांतरित मजुरांना मूळ गावी पोहोचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला आणखी 15 दिवसांची मुदत दिली आहे. याबाबतही देशमुख यांनी माहिती दिली. राज्यात परप्रांतीय कामगार आणि मजूर यांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्यासाठी एसटी आणि ८२२ विशेष श्रमिक रेल्वे सुरु करण्यात आल्यात. यातून आतापर्यंत ११ लाखांपेक्षा जास्त कामगार आणि मजुरांना स्व:गृही पाठविले असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात विशेष करुन मुंबईमध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या स्व:गृही परत जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. एक मे एक जून या महिनाभरात  जवळपास ११ लाख ८६  हजार २१२ परप्रांतीय कामगारांना स्व:गृही परत पाठविण्यात आले.  यासाठी ८२२ विशेष श्रमिक ट्रेन  महाराष्ट्रातील विविध भागातून सोडण्यात आल्याची माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली आहे.

आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये ४५० बिहारमध्ये १७७, मध्यप्रदेशमध्ये ३४, झारखंडमध्ये ३२, कर्नाटक मध्ये ६, ओरिसामध्ये १७, राजस्थान २०, पश्चिम बंगाल ४७, छत्तीसगडमध्ये ६ यासह इतर राज्यांमध्ये एकूण ८२२ ट्रेन या सोडण्यात आलेल्या आहेत असंही देशमुख यांनी म्हटलं आहे.

COMMENTS