अत्याधुनिक बसस्थानके उभारण्यासाठी आराखडा सादर करा –  परिवहन मंत्री अनिल परब

अत्याधुनिक बसस्थानके उभारण्यासाठी आराखडा सादर करा – परिवहन मंत्री अनिल परब

मुंबई – राज्यातील बस स्थानकांमधील स्वच्छता, बसण्याची व्यवस्था, स्वछतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा याकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विशेष लक्ष देऊन प्रवाशांच्या सेवेसाठी कार्य करावे, सर्व सुविधांनी युक्त अशा अत्याधुनिक बसस्थानकांचे आराखडा सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले. मंत्रालयात बस स्थानकातील स्वच्छता आणि नवीन बसस्थानक उभारण्यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी श्री.परब बोलत होते.

परब म्हणाले, राज्यातील बसस्थानके स्वच्छ, सुंदर, आकर्षक असली पाहिजे. बसस्थानकांची वेगळी ओळख आणि प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध होतील असा सर्व सुविधांनी युक्त आराखडा तयार करावा. तो राज्यात सर्व बसस्थानकांमध्ये वापरता येईल. त्यामुळे बसस्थानकांमध्ये एकसारखेपणा येईल आणि सर्व बसस्थानकांमध्ये स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रवाशांच्या बसण्याची व्यवस्था, अधिकारी कर्मचाऱ्यांसाठीची व्यवस्था अशा सुविधा देता येतील.

बसस्थानकांमधील स्वच्छतेबद्दलच्या प्रवाशांच्या तक्रारी दूर कराव्यात. बसस्थानके सुस्थितीत ठेवावी. प्रवाशांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा बसस्थानकामध्ये उपलब्ध करुन दिल्या तर त्याचा फायदा महामंडळाला होईल आणि अधिक एसटीकडे वळतील. राज्यातील बसस्थानकांचा आढावा घेऊन ज्या बसस्थानकाची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे त्याची दुरुस्ती करुन स्वच्छता करावी, जेथे नवीन बसस्थानके उभी करावयाची आहेत त्यासाठी आराखडा तयार करुन बसस्थानकांची ठिकाणे निश्चित करावी. पहिल्या टप्प्यात त्र्यंबकेश्वर, नगर जिल्हातील कर्जत, दापोली या बसस्थानकांचे काम तातडीने पूर्ण करावीत. असेही श्री. परब यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक (बांधकाम) राजेंद्र जावंजळ, मुख्य अभियंता (स्थापत्य) प्रशांत पोतदार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS