लस घेतल्यानंतरही हरियानाचे आरोग्यमंत्री पाॅझिटिव्ह

लस घेतल्यानंतरही हरियानाचे आरोग्यमंत्री पाॅझिटिव्ह

मुंबई – हैदराबादस्थित भारत बायोटेकने विकसित केलेली ‘कोवॅक्सिन’ ही लस चाचणीदरम्यान घेतल्यानंतर हरयाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे या लसीबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

भारत बायोटेकने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थान (एनआयव्ही) आणि दिल्लीतील इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) सोबत एकत्रितपणे करोनावर लस विकसित केली आहे. या कंपनीने आजवर विविध आजारांवर अनेक लस विकसित केल्या आहेत. सध्या भारत बायोटेकने कोरोनावर कोवॅक्सिन नावाच्या लसीवर संशोधन सुरु आहे.

हरियानाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी स्वेच्छेने भारत बायोटेकच्या मानवी चाचणीत भाग घेतला होता. यामध्ये २५,००० पेक्षा अधिक लोकांना चाचणी डोसेस देण्यात आले होते. २० नोव्हेंबर रोजी विज यांना हा डोस देण्यात आला होता. ते हरयाणातील करोनाच्या लसीचा डोस घेणारे पहिले व्यक्ती ठरले होते. दरम्यान ते कोरोना पाॅझिटिव्ह सापडल्यानंतर लसीबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

यावेळी भारत बायोटेकने एक निवेदन सादर केला. या निवेदनात म्हटलं, “आमची क्लिनिकल ट्रायल ही दोन डोसवर आधारित आहे. त्यासाठी २८ दिवस द्यावे लागतात. म्हणजेच कोवॅक्सिन लसीची कार्यक्षमता ही दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनंतर निश्चित केली जाऊ शकते.” हरयाणाचे मंत्री अनिल विज यांनी क्लिनिकल ट्रायलदरम्यान दोन आठवड्यांपूर्वी कोवॅक्सिन लसीचा एक डोस घेतला होता. त्यानंतर ते करोना पॉझिटिव्ह आढळून आले.“चाचणीचा भाग म्हणून ५० टक्के सहभागींना ही लस मिळाली तर इतरांना प्लेसबो देण्यात आला होता. फेज-३ मधील ट्रायल ही दुप्पट करण्यात आली होती. यामध्ये ५० टक्के सहभागींना लस देण्यात आली तर उर्वरितांना प्लेसबो देण्यात आला.”

 

COMMENTS