मुख्यमंत्री महोदय, हा दुटप्पीपणा सोडा – अशोक चव्हाण

मुख्यमंत्री महोदय, हा दुटप्पीपणा सोडा – अशोक चव्हाण

मुंबई -“हा देश सहिष्णु आहे आणि सहिष्णुच राहिलं. त्यामुळे साहित्यकांनी समाजाला, आम्हाला विचार आणि दिशा देण्याचं कार्य करत राहावं” असा मानभावी सल्ला काही वर्षांपूर्वी साहित्यिकांना देणा-या मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सुरक्षेकरिताच ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण रद्द करून साहित्यसंमेलन बंदी करण्यात आली. या घटनेवरून राज्यातील फडणवीस सरकारचा असहिष्णु चेहरा पुन्हा एकदा उघडा पडला आहे. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की,  ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली त्यावेळी संपूर्ण भाजप त्यांच्यावर तुटून पडली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सबनीस यांचे अध्यक्षीय भाषण संपेपर्यंत थांबण्याचे सौजन्यही दाखवले नव्हते. सनातन संस्थेने सबनीस यांना धमकी दिल्यानंतरही मुख्यमंत्री मुग गिळून गप्प होते. परंतु आता साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडून एवढी असहिष्णुता दाखवली जात असताना मुख्यमंत्र्यांनी चार ओळींचा खुलासा करून सोयीस्करपणे हात वर केले, पण आयोजकांच्या या कृतीच्या विरोधात निषेधाचा साधा सूर ही काढला नाही.  हा दुटप्पीपणा नाही तर काय आहे ? आयोजकांची कृती मुख्यमंत्र्यांच्या इच्छेनुसारच आहे, हे यातून स्पष्ट होते असे खा. चव्हाण म्हणाले.

नयनतारा सहगल यांचे विचार मुख्यमंत्र्यांच्या विचारधारेला पचणे अवघड होतेच. पंरतु संमेलनाच्या आयोजकांनी नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण नाकारण्यामागे सुरक्षेचे कारण दाखवले आहे. प्रत्यक्षात ती मुख्यमंत्र्यांची राजकीय सुरक्षा आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दबावाखालीच साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी हा निर्णय घेतलेला आहे. असे नसेल तर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ नयनतारा सहगल यांना स्वतः आवाहन करून संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती करावी. काँग्रेस पक्ष या असहिष्णुतेचा जाहीर निषेध करत असून फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी हा लांछनास्पद प्रकार आहे. आयोजकांच्या या कृतीमुळे देशात महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

COMMENTS