रक्षाबंधनानिमित्त अशोक चव्हाण यांची भावनिक पोस्ट!

रक्षाबंधनानिमित्त अशोक चव्हाण यांची भावनिक पोस्ट!

मुंबई – बहिण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन होय. देशभरात हा सण साजरा केला जात आहे. राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी रक्षाबंधनानिमित्त आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहे. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी देखील रक्षाबंधनानमित्त भावनिक पोस्ट केली आहे.

अशोक चव्हाण यांची भावनिक पोस्ट

कुटुंबामध्ये सर्वात लहान असल्याचा नेहमीच एक फायदा असतो. कारण लहान असल्यामुळे आईबाबांसोबतच बहीण, भावंडांचे प्रेम देखील अगदी भरभरून मिळते. याबाबतीत मी स्वतःला जरा जास्तच नशीबवान समजतो. कारण आईबाबांसोबतच मला माझ्या बहिणींकडून सुद्धा अमाप प्रेम मिळाले. कुटुंबात सर्वात लहान असल्याने माझ्यावर त्यांचा विशेष जीव तर होताच. मात्र माझ्यावरील त्यांच्या या अमाप प्रेमामुळे आम्हा बहिणभावंडांचे नाते आणखीनच घट्ट झाले.

बहिणीला फक्त बहीण मानने मला फार अन्यायकारक वाटते. कारण बहिणीसोबतच ती आपल्या जीवनात एका जिवलग मैत्रिणीची भूमिका सुद्धा निभावत असते. ती बहिणच असते जिच्याजवळ आपण न घाबरता आपल्या मनातली गोष्ट बोलू शकतो, ती बहिणच असते जिच्याशी आपण मनमोकळ्या गप्पा मारू शकतो, ती बहिणच असते जी आपल्या चुका पोटात घालून वेळोवेळी आपल्याला आई बाबांच्या रागापासून वाचवत असते. तिच्या या प्रेमाची तुलना जगात कशाशीही होऊ शकतं नाही कारण ते प्रेम अनन्यसाधारण असते.

माझ्या बहिणींनी कधी माझ्या आयुष्यात मैत्रिणीची भूमिका निभावली तर कधी भावाची. त्यांच्यामुळे भाऊ नसल्याची उणीव मला कधीच जाणवली नाही. त्याच माझ्यासोबत खेळल्या बागडल्या आणि तळहातावरील फोडाप्रमाणे माझी काळजी घेतली. माझ्या जडणघडणीत जेवढा वाटा माझ्या आईबाबांचा आहे तेवढाच वाटा माझ्या बहिणींचा देखील आहे. त्यांनी वेळोवेळी दिलेल्या आधार आणि प्रेमामुळेच मी आज इथवर पोहचू शकलो. त्यांचा माझ्यावरील हा विश्वास एखाद्या हिऱ्यापेक्षाही जास्त अनमोल आहे.

आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने मी त्यांचे आभार मानतो. कारण त्या सदैव माझ्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि आयुष्याच्या प्रत्येक चढउतारावर माझी भक्कमपणे साथ दिली.

COMMENTS