अंबादासजी दानवे, ‘ते’ चुकलेच, पण तुम्हीही थोडा संयम बाळगायला हवा होता !

अंबादासजी दानवे, ‘ते’ चुकलेच, पण तुम्हीही थोडा संयम बाळगायला हवा होता !

औरंगाबाद – औरंगाबादमध्ये मराठा आंदोलनादरम्यान औरंगाबादचे शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि मराठा आंदोलक यांच्यात झटापट झाली. त्यावेळी चिडलेल्या दानवे यांनी मराठा आंदोलकांना धक्काबुक्की आणि लाथ मारली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरल्यामुळे दानवे यांना राग आला आणि आपण त्या मुलाच्या अंगावर धावून गेलो हे दानवे यांनी कबुल केलं आहे. त्या व्हिडिओमध्ये जसं उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याचं स्पष्टपणे ऐकायला येत आहे. त्याच प्रमाणे दानवे कितीही नाकारत असले तरी ते आंदोलकाला लाथा मारत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. दानवेजी व्यक्ती खोटा बोलत असला तरी व्हिज्युल्स खोटे बोलत नाहीत.

दानवेजी, उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे तुम्हाला राग येणं साहाजिक आहे. मात्र मराठा आंदोलाकांचा राग हा काही एकट्या उद्धव ठाकरे यांच्याविरोधातत नाही. तो सर्वच राजकारण्यांच्याविषयी आहे. मग ते मुख्यमंत्री असोत, शरद पवार असोत की अशोक चव्हाण असोत की रावसाहेब दानवे असोत. मुख्यमंत्र्याच्याविषयी सुद्धा अत्यंत खालच्या पातळीवरच्या घोषणा दिल्या जातात. तोच प्रकार शरद पवार यांच्याबाबतीतही होतो. कोणत्याही नेत्याविषयी शिवीगाळ करणं हे अत्यंत चुकीचं आहेच. त्याचं समर्थन होऊच शकत नाही. मात्र मराठा तरुणांची ही चिड राजकीय व्यवस्थेविरोधातील आहे. तुम्ही आणि तुमचे पक्षनेते सत्ताधारी पक्षात आहेत हेही लक्षात असू द्या. ती 17 18 वर्षाची तरुण पोरं आहेत. त्या तारुण्यात असंतोषाची खदखद असते. त्यामुळे तो चुकलाही असेल नव्हे तो चुकलाच. पण तुम्ही इतकी वर्ष राजकारण करत आहात. मोठी पदे भूषवली आहेत. जिल्ह्याचे नेते आहात. त्यामुळे तुम्ही थोडा संयम बाळगाला असता तर बरं झालं असतं.

 

COMMENTS