बंटी पाटलांच्या या रणनितीने शिक्षक मतदारसंघात विजय

बंटी पाटलांच्या या रणनितीने शिक्षक मतदारसंघात विजय

कोल्हापूर : विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही नेहमी संघटनात्मक पातळीवर लढली जात होती. त्यामुळे या निवडणुकीकडे काॅंग्रेस, राष्ट्रवादीने दुर्लक्ष करीत होते. पण यावेळीच्या निवडणुकीची जबाबदारी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतली. या मतदार संघाची निवडणूक ही पक्षीय पातळीपेक्षा संघटनात्मक पातळीवर होत असते. यावेळी प्रथमच ती पक्षीय पातळीवर झाली. काँग्रसने भाजपला आव्हान दिले. यामुळे कृती समिती, शिक्षक भारती, टीडीएफ, शिक्षक परिषद यासह अनेक संघटनांची ताकद विभागली. त्यामुळे अनेक संघटनांची मतदारापर्यंत पोहोचण्यात दमछाक झाली. याउलट काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र सर्वसामान्य निवडणुकीप्रमाणे प्रचारात उतरले.

शिक्षक मतदार संघाशी आपला काही संबंध नाही, असे समजून आतापर्यंत दोन्ही काँग्रेसचे नेते या निवडणुकीकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे या मतदार संघात अलिकडच्या काळात ना कधी काँग्रेसचा झेंडा फडकला ना राष्ट्रवादीचा. यंदा मात्र ‘तुम्ही काँग्रेसला उमेदवारी द्या, निवडून आणण्याची जबाबदारी माझी’असा शब्द गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिला. त्यानुसार प्रा. जयंत आसगावकरांना उमेदवारी मिळताच त्यांची यंत्रणा कामाला लागली. अतिशय सुक्ष्म नियोजन करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला.

बंटी पाटील यांची यशस्वी व्यूहरचना यामुळे शिक्षक मतदार संघात प्रा. जयंत आसगावकर यांच्या रूपाने काँग्रेसचा झेंडा फडकला. याउलट कृती समितीत पडलेली फूट फडल्याने काँग्रेसच्या विजयाला हातभार लागला. आसगावकर जसे शिक्षक आहेत, तसे ते संस्थाचालक आहेत. संस्थाचालक संघटनेचे सचिव आहेत. त्यामुळे सारे संस्थाचालक त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. त्याचाही मोठा फायदा त्यांना झाला.

काँग्रेससमोर आव्हान होते ते आमदार दत्तात्रय सावंत, शिक्षक परिषदेचे जितेंद्र पवार आणि टीडीएफ चे जी. के. थोरात या तिघांचे. राज्य कृती समितीत उभी फूट पडल्याने सावंत यांची ताकद विभागली गेली. थोरात पुण्याचे असल्याने इतर चार जिल्ह्यात त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पवारांच्या प्रचारापेक्षा भाजपने पदवीधरमध्येच अधिक ताकद लावली. त्यामुळे पवारांना म्हणावे तेवढे पक्षाची ताकद मिळाली नाही. कोल्हापूरला यापूर्वी कधीही उमेदवारी मिळाली नव्हती, यंदा ती संधी मिळाल्याने या जिल्ह्याचा आमदार करायचा या निर्धाराने सारे एकदिलाने प्रचारात उतरले. आसगावकरांनी तीन चार वर्षे चांगली तयारी केली होती. त्याचाही फायदा त्यांना झाला.

 

COMMENTS