बारामती ‘बंद’ला १०० टक्के प्रतिसाद ! VIDEO

बारामती ‘बंद’ला १०० टक्के प्रतिसाद ! VIDEO

पुणे – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला आहे. तसेच शरद पवार यांच्या समर्थनार्थ बारामतीमध्ये आज बंद पुकारला असून या बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळाला असल्याचं दिसत आहे. शहरातील सर्व दुकानं, हॉटेल बंद ठेवण्यात आले आहेत.

ईडीच्या नोटीसीबाबत शरद पवार यांची प्रतिक्रिया!

ईडीची नोटीस मला काही मिळालेली नाही. मला जर नोटीस मिळाली तर मी जरूर भाष्य करीन. माझ्या पाहण्यात टेलिव्हिजनवरून जी बातमी आली त्याप्रमाणे राज्य सहकारी बँकेच्या विशिष्ट दहा वर्षांच्या कालखंडामध्ये जे बँकेचे ७० संचालक होते, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यासंबंधीचे वृत्त आहे. तो गुन्हा दाखल करण्या पाठीमागे अशी कारणं दिलेली आहेत की या सहकारी संस्थेमध्ये आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसतानासुद्धा कर्ज देण्यासंबंधीची भूमिका बँकेच्या संचालक मंडळाने घेतली आणि त्यामुळे बँकेचे नुकसान झाले. आणि यामध्ये त्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये जे ७० संचालक होते ते साधारणतः शरद पवार यांच्या विचाराचे होते आणि त्यांच्या संमतीने त्यासंबंधीच्या काही गोष्टी घडल्या असतील.

मला एक-दोन गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत.

1) राज्य सहकारी बँकेत नव्हे तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही सहकारी बँकेमध्ये मी संचालक नव्हतो. त्या संस्थेच्या प्रशासनामध्ये आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये माझा काहीही संबंध नव्हता.

2) जी तक्रार करण्यात आली होती ती कर्जप्रक्रियेदरम्यान अनियमितता झाली असल्यासंबंधीची तक्रार होती आणि त्या तक्रारीमध्ये असा उल्लेख होता की या बँकेच्या संचालकांनी जे अनियमितपणे कर्ज मंजूर केलं ते संचालक शरद पवारांच्या विचारांचे होते. हा त्या गृहस्थाच्या तक्रारीचा भाग आहे.

आणि असं असताना जे वृत्त आलं त्यात माझ्यावर केस करण्या संबंधीचा निकाल जर घेतला असेल तर ती ईडी असेल किंवा राज्य सरकारची कुठली तपास यंत्रणा असेल तर मी त्यांना माझ्या वतीने धन्यवाद देतो. कारण ज्या संस्थेचा मी सभासद सुद्धा नाही आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत माझा संबंधही येत नाही अशा संस्थेमध्ये त्यांनी माझाही सहभाग करण्यासंबंधी भूमिका घेतलेली आहे.

3) राज्यामध्ये एखादी संस्था अडचणीत आल्यानंतर त्या संस्थांना अडचणीतून बाहेर काढण्याच्या संबंधी सुविधा देणे आणि त्यांची परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी सहकार्य करणे हे काम बँकांचे निश्‍चितपणे असते आणि सहकारी बँकांच्या व्यतिरिक्त अन्य बँका सुद्धा सिक युनिट्स ना सिकनेसमधून बाहेर काढण्यासाठी मदत करत असतात आणि अशी मदत करणं म्हणजे त्यांनी काही गुन्हा केला आहे असं नाही.

आज या ठिकाणी गुन्हा दाखल करताना माझ्यावरही त्यांनी केला असेल तर मी त्याचं स्वागत करतो. महाराष्ट्राच्या ज्या जिल्ह्यांमध्ये मी आता जाऊन आलो त्या ठिकाणी जो प्रचंड प्रतिसाद मला आणि माझ्या सहकार्‍यांना मिळाला आणि विशेषतः तरुणांची प्रचंड शक्ती आणि उपस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली त्यानंतर अशा प्रकारची कारवाई नाही झाली तरच मला आश्चर्य वाटलं असतं.

म्हणून ही कारवाई करण्या संबंधीची भूमिका घेणारे जे कोणी सहकारी असतील त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण निवडणुका तोंडावर असताना सुद्धा या ठिकाणी या एजन्सींनी ज्याचा यत्किंचितही या संस्थांची संबंध नाही अशा माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा त्याच्यामध्ये सामील करून घेतलं ही गोष्ट महाराष्ट्रातल्या जनतेला कळल्यानंतर त्याचा उचित अनुकूल परिणाम कुणावर होईल हे सांगायची आवश्यकता नाही.

– शरद पवार

COMMENTS