बार्शी बाजार समितीचा तिढा अखेर सुटला, राजेंद्र राऊत यांना  बिनशर्त पाठिंबा– राजेंद्र मिरगणे

बार्शी बाजार समितीचा तिढा अखेर सुटला, राजेंद्र राऊत यांना बिनशर्त पाठिंबा– राजेंद्र मिरगणे

सोलापूर – बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती सत्तेचं त्रांगडं आज अखेर सुटलं. भाजपचे नेते राजेंद्र मिरगणे यांनी राजेंद्र राऊत गटाला बिनशर्त पाठिंबा देत हा तीढा सोडवला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत कोणत्याही गटाला स्पष्ट बहुमत मिळाललं नव्हतं. राजेंद्र राऊत यांच्या गटाला 9 जागा मिळाल्या आहेत. आमदार दिलीप सोपल यांच्या गटाला 7 जागा मिळाल्या आहेत. तर राजेंद्र मिरगणे यांच्या पॅनलला 2 जागा मिळाल्या आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी 11 सदस्यांची आवश्यकता होती.त्या पार्श्वभूमीवर राजेंद्र मिरगणे यांनी आज राऊत गटाला पाठिंबा दिल्यामुळे बार्शी बाजार समितीचा तिढा अखेर आज सुटला आहे.

दरम्यान स्वच्छ आणि पारदर्शक कारभारासाठी आपण राऊत गटाला पाठिंबा देत असल्याचे मिरगणे यांनी स्पष्ट केलं. तसेच दोघांचाही पक्ष एकच आहे आणि पक्षाच्या भल्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी  पत्रकार परिषदेत सांगितलं. तर लोकसभेसाठी राजेंद्र मिरगणे यांचं नाव पुढं आलं तर आम्ही मदत करू, असं आश्वासन राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिलं, यावेळी बाजार समितीला मिरगणे यांच्यासोबत असलेले तालुक्यातील शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर आणि काँग्रेसचे तालुक्यातील नेते जीवनदत्त अरगडे यांची  अनुपस्थित होती. त्यामुळं त्यांची भूमिका मिरगणे यांच्यापेक्षा वेगळी आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

COMMENTS